शब्दफुले वेचतांना....

Thursday, 26 May 2011

चाहुल!

पलटल्यात आता सावल्या
तिन्हीसांजेला गार वारं
सुटु लागलय...
त्याच्या येण्याची चाहुल देणारं!
आभाळभर विखुरलेले
ढग दिसु लागलेत आताशा!
कोसळणार आहे म्हणे...
दगडावरही बीज रुजेल
असा पाऊस!
कित्येक शतकानंतर!

गुलमोहर तर
बहरलाय ना अंगोपांगी!
भुईमुगही तरारुन उठलाय
गावाकडच्या केळी पण
रसरसल्यात म्हणे!
आणि पपयांच्या भारानं
वाकलीत ना झाडं!

पंख्याआड चिमण्यांची
लगबग सुरु झाली बरं...
एकेक काडी जमवत!
ओढ्याकाठच्या पिंपळाची
सळसळ वाढलीये केवढी तरी!

तेव्हा येशील!
मग मात्र म्हणु नकोस...
मी काही सांगितलं नव्हतं
वेळीच!