शब्दफुले वेचतांना....

Sunday, 26 August 2012

वाट्यास आलेला प्रत्येक क्षण पेरत गेले
बहरलेलं आयुष्य उगवेल या आशेने
...पण जीवनच मातीमोल झाले!

मानापमान, प्रतारणा जळामधे टाकत गेले
शुद्ध जीणे वरती येइल ही आशा
...पण आयुष्य विनामतलब वहात गेले!

शिखरावर नजर ठेउन जगत गेले
पंखांवरती भरवसा ठेउन
...तर जीणे पायदळी पडले!

मिळालेल्या प्रत्येक श्वासाचा हिशेब ठेउन
आयुष्य फुलवु म्हटले तर
...श्वास माझे उंब-यात अडखळु लागले!

व्हावे जगणे अर्थपुर्ण म्हणुन
आयुष्याची होळी केली तरी
 ... शेवटी राखच हाती आली!

Thursday, 23 August 2012

कधी कधी वार्‍यासोबत येणारी सुगंधाची झुळुक असो किंवा आवाज काही जुन्या आठवणी जागायला भाग पाडते. आता हेच पहा ना...मला जाईजुईच्या फुलांचा वास आला की राहुरी कृषी विद्यापीठातले गॅदरींगचे दिवस आठवतात. तेव्हा नविन शाळा नव्हती. माध्यमिकचे गॅदरींगसुद्धा प्राथमिक शाळेच्या स्टेजवर व्हायचे. आणि अस्मादिक प्रत्येक वर्षी कधी शेतकरी नृत्य, तर कधी कोळीनृत्य... , छोटी नाटिका यात भाग घेत असल्याने मेक अप रुममधे जाणं मस्ट असायचं. १ली, २रीचे वर्ग आम्हाला मेकअप करण्यासाठी मिळायचे.
तिथे बेंचेस भिंतीशी लावुन आमचा साजशृंगार चालायचा. मेक अप आर्टीस्ट अर्थातच आमच्यातल्या मोठ्या ताया. पण रुममधलं वातावरण मंत्रमुग्ध करायचं. जाईजुईच्या फ्रेश गजरे, ओठांना लाली (हो. तेव्हा लालीच म्हणायचो), गालावर रुज, बॉबकट केसांना कसेबसे गुंडाळुन घातलेले अंबाडे, कोळी नृत्य/ शेतकरी नृत्यात घालण्यासाठी नउवारी अवजड साड्या नेसतांना एवढ्याशा पोरी..., थोडी हुरहुर,भिती,...एखादीचा मेक अप करायचा राहिला तर तिचे या तायांकडे आर्जव, ऐन प्रोग्रॅम सुरु व्हायच्या वेळेस कुणाची तरी साडी सुटायची, कुठे अंबाडा सुटायचा, मग ऐन वेळेची धावपळ.... हे सगळं आठवतं.

रात्रीच्या शांत वेळेस ट्रकचा हायवेवरुन जातांना होणारा आवाज ऐकला की विद्यापीठाच्या बाहेरुन जाणार्या नगर शिर्डी हायवेवरच्या ट्रकचा आवाज आठवतो. आणि मग आठवतात ते विद्यापीठातले दिवस. त्यावेळेस राहुरी गाव ही विद्यापीठापासुन बरेच लांब वाटायचे. पुजारा क्वार्टर्सकडुन विद्यापीठाचं गेट तिथुन डावीकडे वळालं की हायवे. पाचच मिनिटांनी धर्माडी टेकडी लागायची. रात्री बाबांच्या स्कुटरवरुन येतांना या ठीकाणी मी भितीने डोळे गच्च मिटुन घ्यायचे. पुढे डाव्या हाताला प्रॉजेक्ट, उजवीकडे एम एस इ बी पॉवर स्टेशन, नंतर राहुरी गावाच्या खाणाखुणा दिसु लागत. सुरवातीलाच डावीकडे शेंदुर फासलेल्या ७ माउल्या... नंतर मुळा नदी. या नदीच्या वाळुत कित्ती तरी वेळेस बाबांना घेउन जायचे, शंख शिंपले गोळा करण्यासाठी! :)  नदी संपता संपता उजवीकडे एक मुलांसाठी छान गार्डन, तसेच पुढे गेले की राहुरीचे ग्रामदैवत शंकराच मंदिर...तिथे यात्रा भराय्ची. त्याच्या पुढे गेलं की लाकडाच्या वखारी . थोडं पुढे गेलं की डावीकडे मोठ्ठं मार्केट, तिथे बाहेर नेहमी टांगे लावलेले असायचे. उजवीकडे इंग्लीश मेडीयम शाळा होती. तिच्याबद्दल फार कुतुहल होते. आणि मग उजवीकडे मुख्य गावात जाणारे दोनच रस्ते. पहिल्या रस्त्याने आत गेलं की विद्यामंदिर शाळा, एकमेव उषा टॉकीज. दुसर्या रस्त्याने गेलं की राहुरी म्युनिसिपल हॉस्पीटल...आणि बाजार. बाजाराजवळच एक शनिमंदिर होतं वाटतं...शिंगणापुरसारखा शनीचा चौथरा आठवतो मला. विद्यापीठकरांना बाजारात जाण्यासाठी बसेस होत्या. कित्येकदा आईबरोबर बाजारात गेल्यावर गुडदाणी हा आमचा खाऊ. नंतर लागायचं ते राहुरी एस. टी. स्टँड. या स्टँडच्या समोरच गजराज लाँड्रीवाला होता. तिथे बाबा त्यांचे कपडे द्याय्चे म्हणुन हे आठवतं.. अजुनही ते 'गजराज' तिथेच आहे.
राहुरी गाव सोडलं की जरा हिरवीगार शेती लागायची. आणि नंतर मळीचा वास आला की राहुरी फॅक्टरी आली असं समजायचं. राहुरी फॅक्टरीत पुर्वी गणपतीमधे खुप छान छान नाटकं यायची. 'इथे ओशाळला मृत्यु', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'अखेरचा सवाल' सारखी नाटकं तिथे बघितली. आईबाबांबरोबर स्कुटरवरुन कित्येकदा रात्री तिथुन १२-१२ वाजता परत आलोय. 
हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे...आता दुपारी ऑफीसात बसलेले असतांना बाजुच्याच मुंबई-बेंगलोर हायवेवरुन जाणार्‍या ट्रकचा डिट्टो तसाच आवाज ऐकला. :)

Saturday, 12 May 2012

...आणि चित्रपट बोलु लागला

नमस्कार!
चित्रपटांच्या इतिहासाबद्दल काही लिहावं अशी फार इच्छा होती. कारण ही माहिती मराठीत पुस्तकांव्यतिरिक्त आंतरजालावर कुठेही सापडली नाही. खुप दिवसांपासुन कुठल्यातरी मासिकातुन उतरवलेले संकलन मी आंतरजालावरुन साजेशी चित्र काढुन पुन्हा संकलीत केले. आणि हे आपल्यापुढे सादर करत आहे. काही चुका असल्यास दुरुस्ती करावी. 
सर्व चित्रे आंतरजालावरुन साभार!

'आलम आरा' : भारतातील पहिला बोलपट

आलम आरा या भारतातील सर्वात प्रथम बोलक्या सिनेमाची कहाणी होती प्रेम कहाणी जी एक राजकुमार आणि जिप्सी म्हणजे भटक्या जमातीमधील मुलगी यांची आहे.जोसेफ डेव्हीड यांच्यापारशीनाटकावर आधारीत ही कहाणी होती.
कुमारपुरातला एक राजा. त्याच्या दोन भांडणार्या राण्या.दिलबहार आणि नवबहार. त्यांच्यातील दुश्मनी वाढत जाते जेव्हा एक फकीर भविष्य वर्तवतो की नवबहारचा मुलगा राजानंतर गादीवर बसेल. सुडाने पेटलेली दिलबहार राजाचा मुख्य मंत्री अदिल ला हाताशी धरते. कहाणी मधेच वाईट वळण घेते आणि दिलबहार मुख्यमंत्र्याला कैदेत टाकते व त्याची मुलगी आलम आरा हिला हाकलुन देते.
आलम आरा जिप्सी लोकांमधे वाढते.मोठी झाल्यावर आलम आरा पुन्हा राजवाड्यावर येते आणि इथेच तिची राजकुमारशी भेट होते. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात.
शेवट नेहमीप्रमाणे गोड. आदिलची कैदेतुन सुटका, दिलबहारला शिक्षा आणि प्रेमीयुगुलाचे लग्न. 


निर्माता निर्देशकः श्री. अर्देशीर इराणी


नायक- नायिका: मा. विठ्ठल, झुबेदा

अन्य कलाकारः

पृथ्वीराज कपुर,                        जगदीश सेठ, सखुबाई                   व    वली मोहंमद खान ( W.M. Khan)
शुटींग- स्टुडिओ: इंपिरीयल/ ज्योती स्टुडिओ
मॅनेजरः रेळेदादा
संगितकारः फिरोजशहा मिस्त्री
चित्रपट फँटसी श्रेणीतील म्हणजे पोषाखी
उर्दु नाटकावर आधारीतः भाषा अस्सल उर्दु
मुळ नाटकाचा लेखक: डेवीड जोसेफ
पटकथा: डेवीड जोसेफ
चित्रपटाची लांबी: १०,५०० फुट
निर्मिती खर्चः ४०,००० रु.
पहिले गित: W.M. Khan यांनी फकिराच्या वेषात गायलेले- 'दे दे खुदा के नाम' ( हे पार्श्वगीत नाही)
गाजलेला डायलॉगः सखुबाईच्या तोंडी असलेला: " मेरे प्यारे भोले शोहर, तुम मत जावो, मेरी सीधी आँख फडकती है"


प्रिमियर शो: १४ मार्च १९३१- मुंबईतील पहिले कायम स्वरुपी थिएटर .... मॅजेस्टीक सिनेमा इथे.


चित्रपटात सर्वप्रथमः ट्रॉलीचा शुटिंगसाठी प्रथम उपयोगः १९३१ 'चन्द्रसेना' मुकपट
प्रथमच पार्श्वसंगीत न वापरता, पार्श्वध्वनीचा वापरः १०३७, 'कुंकू'- दुनिया ना माने


प्रथमच समकालीन व्यक्तीच्या चरीत्रावर चित्रपटः १९४७ ' डॉ. कोटणीस की अमर कहानी'
प्रथमच वन शॉट वन सीनः डॉ. कोटणीस की अमर कहानी


प्रथम प्रादेशिक फिचर फिल्मः १९३२,'अयोध्येचा राजा'
आज अस्तित्वात असलेला सर्वात जुना चित्रपटः 'अयोध्येचा राजा'

प्रथम रौप्यमहोत्सवी हिंदी चित्रपटः १९३४,'अमृतमंथन'

प्रथमच डोळ्याचा क्लोजअप ( टेलिफोटो लेन्सद्वारे): १९३४,'अमृतमंथन'

प्रथमच बॅकप्रोजेक्शनः १९३६,' अमरज्योती'प्रथम सतत १०० आठवडे एकाच थिएटरमधे चाललेला भारतीय चित्रपटः १९४३, 'शकुंतला'

प्रथम अमेरीकेत व्यावसायिकदृष्ट्या प्रदर्शीत होणारा भारतीय चित्रपटः १९४३,' शकुंतला'
पहिला गायकः व.म. खान (आलम आरा)पहिली गायिका: झुबेदा ( आलम आरा)पहिला गुन्हेगारी पार्श्वभुमीवरचा चित्रपटः १९४३, 'किस्मत'


पहिला खलप्रवृतीचा नायकः अशोककुमार ( किस्मत)


प्रथम लॉस्ट ऍंड फाउंडः १९४३,' किस्मत'पहिले चित्रप्रदर्शन ( चित्रपट नव्हे): १८९६, वॅटसन हॉटेल ( मुंबई)प्रथम निर्माता निर्देशक : ह.स. भाटवडेकर उर्फ सावे दादा
प्रथम समाचार चित्र : १९०१ निर्माता: सावेदादा
हत्तीवर लॉर्ड आणि लेडी कर्झन                                                    


 

प्रथम फिचर फिल्मः ३ मे १९१३ " राजा हरिश्चंद्र" - दादासाहेब फाळके


प्रथम दक्षिण भारत फिल्मः १९१९, 'किचकवधम" - नटराज मुदलियार

प्रथम प्रेमकथा: १९३१, 'लैला- मजनु', 'शिरी- फरहाद'

दोन्हीचे कलाकारः मा. निस्सार, कज्जन


प्रथम ऐतिहासिक बोलपटः १९३९' पुकार'प्रथम पौराणिक बोलपटः १९३२, "अयोध्या का राजा"


लिंगरिंग शॉटचा पहिला प्रयोगः १९३० 'खुनी खंजर'
 पहिला देशभक्तीपर चित्रपटः १९३२,' हिंदोस्थान'
पहिले गाजलेले देशभक्तीचे गाणे: १९४३, (किस्मत) " दुर हटो ए दुनियावालो..."
प्रथम बाल मुकपटः १९३०,'राणीसाहेब"
प्रथम तमासगिर/ शाहिरी पार्श्वभुमीवरील चित्रपटः १९४५,' रामजोशी"
पहिला संगितकारः फिरोजशहा मिस्त्री, ( आलम आरा)

Saturday, 14 January 2012

रातझुलारातझुला
झुलते सय

दूर सर्वदुर
क्षितीज की नजर?

चुकार घननीळा
चंद्रच खुळा

उंचच उंच
आभाळ की आठव?

पाठीवरती
उठले वळ

खोल खोल
अंतरंग की सल?

खुपते मनी
धुमसते मन

जळतही नाही
ना विझते कधी

फुटणार कधी
कोंडी की पहाट?