शब्दफुले वेचतांना....

Wednesday, 11 May 2016

~सज्जनगडचा तो सुर्योदय~
तसं सज्जनगडावर पुर्वी एक-दोनदा जाणे झाले होते पण ते आपले उगाच भोज्याला शिवुन आल्यासारखे.
निवांतपणे जायला २०१२ चा मे महिना उजाडावा लागला.
झालं असं , त्या वर्षी आम्हां दोघी मैत्रिणींमधे एक 'प्रासंगिक करार' झाला की तिच्या वाढदिवसाला ती माझ्याबरोबर सज्जनगडावर येणार आणि माझ्या वाढदिवसाला ती मला गोंदवल्याला घेऊन जाणार.
ठरल्याप्रमाणे मी, माझा मुलगा, मैत्रीण शोभा १३ मे ला निघालो. मुलाला तिथल्या योगशिबिरासाठी ८ दिवस थांबायचे असल्याने सामान अंमळ जास्तच होते. मुलाला आदल्या दिवशी बाबा पुता करुन तयार केले होते, की मस्त ट्रेकिंग होईल.

दुपारी ३ वाजता सातारा एस टी स्टॅन्ड्वर पोहोचलो. तिथुन सज्जनगडची गाडी पकडुन अर्ध्या तासात सज्जनगडावर पोहोचु असे वाटले होते. पण ... पण आडवा आला!
त्यादिवशी नेमका शनिवार असल्याने गडावर गर्दी. एस टी ला पार्किंग नसल्याने अर्ध्यातुनच वळवण्यात येत होत्या.

झालं ! सॅक पाठीवर लादुन, भर उन्हात, घामेघुम होतआमची स्वारी हाश्श...हुश्श करत ५ वाजता एकदाची गडावर डेरेदाखल झाली. आदल्या दिवशी वळवाचा पाऊस झाला असल्याने जमिनीतील पाण्याची वाफ होऊन उन्हाचा चटका अधिकच लागत होता . खरोखर ट्रेकिंग च झाले.
गेल्या गेल्या आधी गडावर थन्डगार पाण्याने स्नान, आणि मग दर्शन घेउन सुर्यास्त पहाण्यासाठी मागच्या पठारावर पळालो.

उरमोडी धरणाच्या चमचमत्या पाण्याने आणि भन्नाट वार्‍याने स्वागत केल.
याच वाटेने जात असतील ना समर्थ मारुतीच्या दर्शनाला? ..
या पायवाटेनेच शिवराय आणि समर्थ त्या तिकडे लांबवर जाउन दरीच्या टोकावर बसून वार्तालाप, राजकीय सल्लामसलती करत असतील ना ?...
या खड्कावरच बसून समर्थ रोजची उपासना करत असतील का?... नुसत्या विचारांनी सुद्धा शहारा येतोय अंगावर!

अश्याच तंद्रीत धाब्याचा मारुती मन्दिरात दर्शन घेउन निघालो आणि धीरे धीरे सुर्यनारायण अस्ताला जाउ लागला. एक उदासमय, गुढ वातावरण! अंधार पडला तस गारवा अजून वाढला. भर उन्हाळ्यातही गारवा अनुभवायचा असेल तर समर्थांच्या पायाशिच जायला हवं !

आता आरतीसाठी राम मंदिरात! भारावलेल्या वातावरणात धीरगंभीर स्वरात संध्याकाळची आरती, श्रीधर स्वामीन्च्या मठात दर्शन घेउन भोजन प्रसाद घेतला. गडाच्या मागच्या बाजुस रुम मिळाल्या होत्या. सोनाळे तळ्याजवळ जरा रेंगाळलो खरं… तो आकाशात नक्षत्रे चमकु लागली होती. रात्र वाढु लागली... मागच्या दरवाजातुन बाहेर निघुन रुमकडे जातांनाआकाशात लक्ष गेले आणि थबकलोच. टिपुर चांदणं पडलं होतं .. तो ठळक शुक्रतारा,ते सप्तर्षी, तो ध्रुव, …. आभाळभर नुसती चांदण्यांची रांगोळी ... !
अवर्णनिय अनुभव...किती वेळ ते पहात बसलो आणि अचानक जाणवल, की गडाचा मागचा दरवाजा बंद झालाय. पठारावर गर्द अंधार... आणि एक जीवघेणी शान्तता आसमंत व्यापून आहे.
काकडआरतीला हजेरी लावायची होती. म्हणुन लगोलग रुमवर आलो. सौरउर्जेमुळे पहाटे गरमागरम पाणी मिळाले.

राममंदिरातली घंटा वाजु लागली होती. पहाटेच्या मंगलमय वातावरणात, सुरेख स्वरातली आरती, तिथल्या सजीव भासणाऱ्या श्रीराम- जानकी मूर्ती , चौपाया, सवाया म्हणणारे बालरामदासी, मनाचे श्लोक, कोमल वाचा दे रे राम...अंतर्मुख करणारी करुणाष्टके! त्यानंतर समाधीदर्शन करुन , श्रीधर स्वामी मठाकडे. तिथे दर्शन घेतले आणि चहा तयार असल्याची वर्दी आली. साडेपाच सहा वाजण्याचा सुमार असेल. समर्थ सेवा मंडळाजवळच्या उपहारगृहातून चहाचे कप घेतले...आणि सहज जाणवले. पुर्वेकडे तांबडं फुटु लागलं होतं .
एक मस्त, भन्नाट आयडीया सुचली..... चला चहाचे कप घेउन अगदी दरीच्या काठावर जाउन बसु. सुर्योदय पहाता पहाता चहा घेउया... अफलातुन!

जाउन बसलो दरीच्या काठावर. समोरची काळीकभिन्न डोंगररांग आता कात टाकून निळी-काळी- करडी दिसू लागली होती. तिच्यावर निळसर धवल धुक्याची रेषा!दरीतलं गाव, परळी.. हळुहळु जागं होतय. आदल्या दिवशी पडुन गेलेल्या पावसाने धुक्याची अलवार चादर गावावर पसरलिय. ते पहाता पहाता आम्ही कशासाठी आलो तेच विसरलो. अश्या भारावलेल्या मनस्थितीत किती वेळ गेला कुणास ठाउक! वातावरणातला उच्चांकी प्राणवायु भरभरून घेत होतो. बाजूला खडकावर ठेवलेला चहा आमची वाट पाहून केव्हाच गार झाला होता.
तेवढ्यात भानावर येत शोभाची हलकीशी आरोळी ," नयने ते बघ! क्षितिजावर!"!
'आहा' असं उच्चारायला केलेला तोंडाचा 'आ' तसाच वासलेला राहिला. पूर्व क्षितीजावर केशरी करंडा लवंडून रंग पसरलाय , डोंगराच्या आडून धुक्याची चादर दूर करत केशरी तांबूस गोळा डोकावतोय…वर येतोय. सहस्त्ररश्मी आपले सहस्त्र किरणे उधळत वर येत आहेत. काय दृश्य होते ते!!
अगदी अंतर्यामी साठवून ठेवावे असे!!
सगळच जादूमय!

अश्या वेळी कैमेरा बाहेर काढायचा असतो हे सुद्धा विसरलोय.
दोघीतला संवाद केव्हाच बंद झाला होता.
दूर सर्वदूर… नजर पोहोचेल तिथे डोंगररांगा… आणि ही आसमंतात व्यापून विलक्षण शांतता! आता या क्षणी या पृथ्वीतलावर आपण अगदी एकटे… कुठलीही वासना, पारमार्थिक ईच्छा, महत्वाकांक्षा,भय, द्वेष, मत्सर, संघर्ष... हेव्यादाव्यांच्या मनातल्या परिघात चालणाऱ्या व्यर्थ खेळाच्याही पार!
सगळच अलौकिक! भान हरपुन हे दृश्य... ही नीरवता हृदयात साठवावी अशी!
ही असामान्य शान्ति आता आत खोलवर झिरपतेय...पुढे तिचे लोट होत आहेत नसानसात... पेशीपेशीत! देह विरघळतोय कणाकणाने ! मी निर्विकार.… मी निर्विकल्प! मी आकारहिन्, अस्तित्वहिन् ! मी देहातीत! मी कोण? सोSहं!! विश्वाच्या अगणित पसार्यात एक बिंदु … इतकंच माझं अस्तित्वं ! हे पिसासारखं हलकं झालेल मन वाऱ्याच्या हलक्याश्या झूळकेवर विहरतय!
हीच का ती मुक्तावस्था, एकमेव अद्वैत अवस्था? चिदाकाशात भरून राहिलेल फ़क्त अलौकिक चैतन्य! इथे किती असीम शान्ति आहे!

त्या मंतरलेल्या अवस्थेत किती तरी वेळ तसच बसून होतो.
तेव्हा कुठे माहित होतं ही फक्त नांदी आहे... हा सुर्य श्री क्षेत्र गोंदवल्याहुन श्रीरामाच्या भेटीचं निमंत्रण घेऊन आलाय ते आणि आपल्या आयुष्यात तनामनाला उजळवणारी पहाट फुलवणार आहे ते!