शब्दफुले वेचतांना....

Sunday 26 August 2012

वाट्यास आलेला प्रत्येक क्षण पेरत गेले
बहरलेलं आयुष्य उगवेल या आशेने
...पण जीवनच मातीमोल झाले!

मानापमान, प्रतारणा जळामधे टाकत गेले
शुद्ध जीणे वरती येइल ही आशा
...पण आयुष्य विनामतलब वहात गेले!

शिखरावर नजर ठेउन जगत गेले
पंखांवरती भरवसा ठेउन
...तर जीणे पायदळी पडले!

मिळालेल्या प्रत्येक श्वासाचा हिशेब ठेउन
आयुष्य फुलवु म्हटले तर
...श्वास माझे उंब-यात अडखळु लागले!

व्हावे जगणे अर्थपुर्ण म्हणुन
आयुष्याची होळी केली तरी
 ... शेवटी राखच हाती आली!

Thursday 23 August 2012





कधी कधी वार्‍यासोबत येणारी सुगंधाची झुळुक असो किंवा आवाज काही जुन्या आठवणी जागायला भाग पाडते. आता हेच पहा ना...मला जाईजुईच्या फुलांचा वास आला की राहुरी कृषी विद्यापीठातले गॅदरींगचे दिवस आठवतात. तेव्हा नविन शाळा नव्हती. माध्यमिकचे गॅदरींगसुद्धा प्राथमिक शाळेच्या स्टेजवर व्हायचे. आणि अस्मादिक प्रत्येक वर्षी कधी शेतकरी नृत्य, तर कधी कोळीनृत्य... , छोटी नाटिका यात भाग घेत असल्याने मेक अप रुममधे जाणं मस्ट असायचं. १ली, २रीचे वर्ग आम्हाला मेकअप करण्यासाठी मिळायचे.
तिथे बेंचेस भिंतीशी लावुन आमचा साजशृंगार चालायचा. मेक अप आर्टीस्ट अर्थातच आमच्यातल्या मोठ्या ताया. पण रुममधलं वातावरण मंत्रमुग्ध करायचं. जाईजुईच्या फ्रेश गजरे, ओठांना लाली (हो. तेव्हा लालीच म्हणायचो), गालावर रुज, बॉबकट केसांना कसेबसे गुंडाळुन घातलेले अंबाडे, कोळी नृत्य/ शेतकरी नृत्यात घालण्यासाठी नउवारी अवजड साड्या नेसतांना एवढ्याशा पोरी..., थोडी हुरहुर,भिती,...एखादीचा मेक अप करायचा राहिला तर तिचे या तायांकडे आर्जव, ऐन प्रोग्रॅम सुरु व्हायच्या वेळेस कुणाची तरी साडी सुटायची, कुठे अंबाडा सुटायचा, मग ऐन वेळेची धावपळ.... हे सगळं आठवतं.

रात्रीच्या शांत वेळेस ट्रकचा हायवेवरुन जातांना होणारा आवाज ऐकला की विद्यापीठाच्या बाहेरुन जाणार्या नगर शिर्डी हायवेवरच्या ट्रकचा आवाज आठवतो. आणि मग आठवतात ते विद्यापीठातले दिवस. त्यावेळेस राहुरी गाव ही विद्यापीठापासुन बरेच लांब वाटायचे. पुजारा क्वार्टर्सकडुन विद्यापीठाचं गेट तिथुन डावीकडे वळालं की हायवे. पाचच मिनिटांनी धर्माडी टेकडी लागायची. रात्री बाबांच्या स्कुटरवरुन येतांना या ठीकाणी मी भितीने डोळे गच्च मिटुन घ्यायचे. पुढे डाव्या हाताला प्रॉजेक्ट, उजवीकडे एम एस इ बी पॉवर स्टेशन, नंतर राहुरी गावाच्या खाणाखुणा दिसु लागत. सुरवातीलाच डावीकडे शेंदुर फासलेल्या ७ माउल्या... नंतर मुळा नदी. या नदीच्या वाळुत कित्ती तरी वेळेस बाबांना घेउन जायचे, शंख शिंपले गोळा करण्यासाठी! :)  नदी संपता संपता उजवीकडे एक मुलांसाठी छान गार्डन, तसेच पुढे गेले की राहुरीचे ग्रामदैवत शंकराच मंदिर...तिथे यात्रा भराय्ची. त्याच्या पुढे गेलं की लाकडाच्या वखारी . थोडं पुढे गेलं की डावीकडे मोठ्ठं मार्केट, तिथे बाहेर नेहमी टांगे लावलेले असायचे. उजवीकडे इंग्लीश मेडीयम शाळा होती. तिच्याबद्दल फार कुतुहल होते. आणि मग उजवीकडे मुख्य गावात जाणारे दोनच रस्ते. पहिल्या रस्त्याने आत गेलं की विद्यामंदिर शाळा, एकमेव उषा टॉकीज. दुसर्या रस्त्याने गेलं की राहुरी म्युनिसिपल हॉस्पीटल...आणि बाजार. बाजाराजवळच एक शनिमंदिर होतं वाटतं...शिंगणापुरसारखा शनीचा चौथरा आठवतो मला. विद्यापीठकरांना बाजारात जाण्यासाठी बसेस होत्या. कित्येकदा आईबरोबर बाजारात गेल्यावर गुडदाणी हा आमचा खाऊ. नंतर लागायचं ते राहुरी एस. टी. स्टँड. या स्टँडच्या समोरच गजराज लाँड्रीवाला होता. तिथे बाबा त्यांचे कपडे द्याय्चे म्हणुन हे आठवतं.. अजुनही ते 'गजराज' तिथेच आहे.
राहुरी गाव सोडलं की जरा हिरवीगार शेती लागायची. आणि नंतर मळीचा वास आला की राहुरी फॅक्टरी आली असं समजायचं. राहुरी फॅक्टरीत पुर्वी गणपतीमधे खुप छान छान नाटकं यायची. 'इथे ओशाळला मृत्यु', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'अखेरचा सवाल' सारखी नाटकं तिथे बघितली. आईबाबांबरोबर स्कुटरवरुन कित्येकदा रात्री तिथुन १२-१२ वाजता परत आलोय. 
हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे...आता दुपारी ऑफीसात बसलेले असतांना बाजुच्याच मुंबई-बेंगलोर हायवेवरुन जाणार्‍या ट्रकचा डिट्टो तसाच आवाज ऐकला. :)