शब्दफुले वेचतांना....

Saturday, 10 October 2015

ह्या इथुन, गल्लीच्या कोपर्‍यावरुन उजवीकडे वळलं ना…
की एक लालबुंद गुलमोहर आहे!
तिथून जातांना गदगदुन हलतो नि खुणावतो आताशा...
" बघ मी कसा बहरलोय ' अस म्हणत!
वाटेतली एका फाटकावर चढलेली नखरेल सायली
हळुच वाकुन आपल्याशी सलगी करते... कानात कुजबुजते!
आणि कधीकधी हे निळभोर आकाश एखाद्या ढगाच्या तुकड्याशी दिवसभर कशी दंगामस्ती करते हे ही दिसु लागलय... माझ्या एवढ्याश्या खिडकीतुन!
आपण गाडी लावतो ना तिथे एक पिंपळ आहे!
रोज सळसळुन स्वागत करतो तो ...हे आताच उमजु लागलय!
नेहमीची ही खुरटलेली झाडेही हिरवीगार होउ लागलीयेत!
आणि तो कालच पाहिलेला एवढासा बहावा!
भरघोस माळा लटकवुन वाकुल्या दाखवत असतो...
हे.. हे... सगळ नव्यानेच अनुभवायला मिळतय सध्या!
कितीतरी गोष्टी नव्यानेच समजतायत सध्या!
नवेच वाहु लागलेत म्हणे वारे!
नेहमीचेच असुनही... अनोळखी वाटु लागले आहेत रस्ते!
...
...
अरेच्चा, आणि...आणि हे झोकदार वळण!... हे कसं दिसलं नाही आतापर्यंत ??
( छे, कुणास ठाऊक! कुठे निसटलीत मधली काही वर्षे?)अज्ञाताच्या गुढ वाटेवर
जलाशयाच्या काठाशी
सृष्टीच संगीत ऐकतांना
विहरणारी शब्दांची पाखरे
निशब्द होऊन हळुच
विसावतात मनाच्या
गाभार्यात!

 
अंधाराच्या पायघड्यांवर
दूरवरून रेलत रेलत
येणारे उजेडाचे तरंग
उजळत जातो मनाचा
एकेक कोपरा...

विरळ होत जाते
अस्तित्वाची जाणिव
नेणिवेच्या पार....
श्वासोच्छवासाची लयीत
उर्ध्व नजर ब्रम्हरन्ध्राकडे
एकेक दीर्घ श्वास ….
खोल खोल नाभीपर्यंत
ओघळत जातो अंतर्नाद
अन मग सुरु होतात
रंगाची आवर्तेने...
अस्तित्वाचा विलयाचा
सोहळा...

शिथील गात्रे, वृत्ती स्थिर,
उर्मी निवळलेल्या
अस नितळ नितळ होतांना
देहाच्या कणाकणातून,
पेशीपेशीतून
रंध्रारंध्रातून ….
झिरपत जातांना
विरळ होत...
एकेक शृंखला
तुटत जाते…
एकेक आवरण
उलगडत…
अंतरातील नादब्रम्ह
एकरुप होते
ब्रम्हांडातल्या
त्या आकाशतत्वाशी
...
आणि मग चिदाकाशात
भरुन रहातो
फक्त नाद 

अनाहत नाद.....!