शब्दफुले वेचतांना....

Saturday, 10 October 2015
अज्ञाताच्या गुढ वाटेवर
जलाशयाच्या काठाशी
सृष्टीच संगीत ऐकतांना
विहरणारी शब्दांची पाखरे
निशब्द होऊन हळुच
विसावतात मनाच्या
गाभार्यात!

 
अंधाराच्या पायघड्यांवर
दूरवरून रेलत रेलत
येणारे उजेडाचे तरंग
उजळत जातो मनाचा
एकेक कोपरा...

विरळ होत जाते
अस्तित्वाची जाणिव
नेणिवेच्या पार....
श्वासोच्छवासाची लयीत
उर्ध्व नजर ब्रम्हरन्ध्राकडे
एकेक दीर्घ श्वास ….
खोल खोल नाभीपर्यंत
ओघळत जातो अंतर्नाद
अन मग सुरु होतात
रंगाची आवर्तेने...
अस्तित्वाचा विलयाचा
सोहळा...

शिथील गात्रे, वृत्ती स्थिर,
उर्मी निवळलेल्या
अस नितळ नितळ होतांना
देहाच्या कणाकणातून,
पेशीपेशीतून
रंध्रारंध्रातून ….
झिरपत जातांना
विरळ होत...
एकेक शृंखला
तुटत जाते…
एकेक आवरण
उलगडत…
अंतरातील नादब्रम्ह
एकरुप होते
ब्रम्हांडातल्या
त्या आकाशतत्वाशी
...
आणि मग चिदाकाशात
भरुन रहातो
फक्त नाद 

अनाहत नाद.....!

No comments:

Post a Comment