नाशिक येथील श्री. नीळकंठ मोहिनीराज नांदुरकर यांनी अल्पशा संदर्भ सामग्रीवर संत निळोबाराय यांचं जीवनचरित्र लिहिलं आहे. त्यावरुनच निळोबांचा अल्पपरिचय करुन देते.
उपलब्ध सामग्रीनुसार निळोबाराय यांचा जन्म इ.स. १६३५ मधे झाला. घोडनदीकाठचं शिरुर गाव. तिथले शिवभक्त मुकुंदपंत यांच्याकडे 'कुलकर्णी'पद होतं. सारा गाव मुकुंदपंतांना पंतकाका म्हणे. मुकुंदपंत म्हणजे अतिशय सात्विक आणि सत्योपासक शिवभक्त. लग्नाला दोन तपं उलटुन गेली तरी पोटी मुल नव्हतं. काया वाचा मने अगदी निष्काम भावनेने भगवान रामलिंगाची सेवा केली. कधी ऐहिक गोष्टींची याचना केली नाही. विचार हाच की शाश्वताकडे अशाश्वत गोष्टी मागुन आपल्या भक्तीस उणेपणा आणायचा नही. पण कुटुंबाने खुपच आग्रह केल्यामुळे महाशिवरात्रीस भगवान श्री रामलिंगास अभिषेक करतांना साकडं घातले. आणि त्याच रात्री रामलिंगाने स्वप्नात येउन दृष्टांत दिला. प्रभु म्हणाले," वत्सा, तुझी एकनिष्ठ भक्ती आम्हांस पावली. तुझी कामना पुर्ण होईल. पुढील संवत्सरीच तु पुत्रवान होशील. तुझ्या वंशी कुलदीपक हरिभक्त उपजावा ही मुळी ईश्वरी योजनाच आहे. तुझा पुत्र भगवदभक्त होउन संत म्ह्नणुन विख्यात होईल. तुजप्रत कल्याण असो".
राधाबाई निळोबारायची आई. थोड्याच दिवसात 'ती' गोड बातमी कळली. आणि राधाबाईंचे कोडकौतुक सुरु झाले. दिवस जात होते. राधाबाईंना मुलखावेगळे डोहाळे लागले. त्यांना वाटे, "किर्तन करावं. पायात चाळ बांधुन अन हाती चिपळ्या घेउन नाचत नाचत पंढरीस जावं. विटेवरलं ते सावळं परब्रम्ह डोळे भरुन पहावं". आणि पंतांनी त्यांचे डोहाळे पुरवायचं ठरवलं. अक्षयतृतीया ही तिथी ठरली. वीस बैलगाड्या, दहा घोडी, भांडीकुंडी, शिधासामग्री, कापडचोपड, तंबु, कनाती, आचारी, पाणके म्हणता म्हणता तीसेक माणसं झाली. शिवाय वाटेत संरक्षणासाठी पंचवीस हत्यारबंद स्वार. मजल दरमजल करत, मुक्कामाच्या ठिकाणी भजन, किर्तन करत मार्गी लागले. नवमीला तिसर्या प्रहरी पंढरीस पोचले. उभयतांनी दशमीस पहाटे महापुजा केली. तेवढ्यात वर्दी आली की देहुचे थोर संत तुकाराम महाराज २०-२५ मंडळींसह विठ्ठलमंदिरी आलेले आहेत. बातमी ऐकताच मुकुंदपंत, राधाबाई आनंदले. दोघांनीही तुकोबाचे दर्शन घेतले. ऊन्ह उतरल्यावर महाराज वाळवंटातच किर्तनास उभे राहिले. त्यांच्या रसाळ किर्तनाचा आस्वाद घेउन पंतांनी महाराजांना बिदागी दिली.
सातवा महिना लागताच राधाबाईचं थाटात डोहाळेजेवण झालं. श्रावण शुद्ध प्रतिपदेला बाळाचा जन्म झाला. आणि पाचवी पुजताच पंतांनी बाळाची जन्मपत्रिका पाहिली. भगवान रामलिंगाने सांगितलेलं तंतोतंत आढळलं. बाळाचं नाव 'निळकंठ' ठेवण्यात आलं. दिसामासांनी निळोबा वाढु लागले. अवध्या तिसर्या वर्षीच आपल्या बोबड्या स्वरात पंतांच्या साथीने रुद्र म्हणु लागले. पाचवं वर्ष पार पडलं आणि पंतांनी निळोबाची मुंज ठरवली. ठरलेल्या मुहुर्तावर निळोबांची मुंज झाली. बटुवेशात तर तो फारच गोंडस दिसत होता. क्षौर केलेले, मागे घेरा, गोरापान, कपाळी गंध, डोळ्यांत काजळ, गाली दृष्टबोट, गळ्यात यज्ञोपवीत, कमरेस कौपीन व मुंज हाती दंड,मोठं गोजीरं रुप. मकाशिर्यांचे कुलोपाध्ये शेषाचार्य पोळ म्हण्जे मोठा ज्ञानी माणुस. पार काशीपर्यंत त्यांच्या विद्वत्तेचा गवगवा झालेला. पंतकाकांनी निळोबारायास मांडीवर घेउन त्याच्या कानी गायत्री मंत्र उपदेशिला. मग शेषाचार्यांनी त्याला ब्राम्हणांची कर्तव्ये सांगितली.
रात्री भिक्षावळही थाटात निघाली.
निळोबांचं पाठांतर उत्तम. पलोबां(स्नेह्यांच्या) घरातील ७-८ पिढ्यांनी जमवलेली ३००-४०० ग्रंथांची ग्रंथसंपदा मिळाली आणि निळोबांचे वाचन सुरु झाले. त्यांचं वाचन अगदी स्पष्ट. आवाज खणखणीत त्यामुळे आजुबाजुच्या आया-बाया येउन बसु लागल्या. नंतर गर्दी वाढु लागली. काही पुरुषही येउ लागले. निळोबा मधुन मधुन छान निरुपण करत. भावार्थ रामायण झालं, नाथभागवत झालं. पाठोपाठ ज्ञानेश्वरी झाली. मग हे तिनही ग्रंथ त्यांनी स्वहस्ताक्षरात दीड्-दोन वर्षात नकलुन काढले.
बघता बघता निळाला १६वं लागलं. मधल्या ४-५ वर्षाच्या काळात त्याने शेषाचार्यांकडुन संस्कृत शिकुन घेत्लं होतं. पंतकाकांकडुन कुलकर्णीचे कामकाज शिकुन घेतलं. शिवाय ज्ञानदेव, नामदेव व एकनाथ महाराज यांचे अभंग, गौळणी, भारुडं हे सारं नकलुन घेतलं.
आता राधाबाईंना (निळोबांच्या आईला) सुनमुख पहायची घाई झाली. पंतांकडे तिने टुमणं लावलं. वाळकीच्या अप्पासाहेब जहागीरदारांची मुलगी मैना ही सून म्हणुन मकाशिर्यांच्या घरात आली. आणि वर्षभरातच भगवान रामलिंगाच्या आज्ञेने पंतांचं निर्वाण झालं. निळुचे पितृछत्र हरपले आणि दोनच महिन्यात मातोश्रींनी जीवनयात्रा संपवली.
मध्यंतरीच्या काळात निळुच्या सदाचारणाबद्दल आणि कुलकर्ण्यांच्या कुशलतेबद्दल त्याच्या भाऊबंदात मत्सराचा डोंब उठला. नागूअण्णा मकाशिर्यांची पोरं नि नातवंडं अति टवाळ. निळूला जाता येता पिंपळपारावर बसुन चिडवु लागली. इतकं की थेट सुभेदारापर्यंत चहाड्या करण्याची त्यांची मजल गेली. आणि एक दिवस नेमकी विजयादशमी पाहुन १०-१२ स्वारानिशी तहशीलदार हिशेब तपासणीसाठी आला. बोलुन चालुन यावनी राजवट. निळोबा पुजेस बसले होते. तहसीलदाराची भाषा उर्मट. निळोबा तडक चावडीवर गेले.मुजरा करुन दप्तर तहसीलदारापुढे ठेवले. -सर्व हिशेब चोख. कुठे एवढीशीही चुक नाही. पण तेवढ्या एका प्रकाराने निळुचं कुलकर्णीपदावरचं मन उडालं. हरिभक्तीत व्यत्यय येतो ते काम करायचं नाही. भगवान श्रीरामलिंगाच्या साक्षीने दप्तर पिराजी पाटलाकडे सुपुर्द केले आणि ग्रामत्याग केला.
पराशर ऋषींची तपोभुमी पारनेरास प्रयाण केलं. पलोबांच्या श्वशुरांचे एक घर रिकामेच होते. अंमळ दुर, गावाच्या टोकाला,पण दोन खणी, तीन खोल्यांचे- चौफेर बाग अन जवळच श्रीनागेश्वराचे मंदिर. निळोबारायास आणि मैनेस हे घर फार आवड्ले. कर्मधर्मसंयोगाने नागेश्वराचे पुजारीपण गावकर्यांनी निळुस दिले. निळूस त्याच्या आवडीचे काम मिळाले. पहिल्याच एकादशीस त्याने देवळात कीर्तन केले. ते इतके बहारीचे झाले की गावकरी खुप आनंदले.
निळोबास आता पंढरीची ओढ लागली होती. ज्ञानोबा माउली, नामदेव, चोखोबा, गोरोबा, जनाई, नाथमहाराज, तुकाराम महाराज अशा थोर थोर संतांनी वर्णिलेलं ते विटेवरचं सावळं परब्रम्ह डोळे भरुन पहावं अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. काही आठवड्यातच मैनेस दिवस गेले. आणि एका पौषात सुमुहुर्तावर सगळे पंढरीस निघाले. जशी पंढरी जवळ येउ लागली तशी निळोबांची वृत्ती प्रफुल्लित झाली. दुपार टळत आली होती. पंढरीच्या वेशीस पोहोचले आणि निळोबाने तडक गाडीतुन उडी मारली. वेशीसमोर दंडवत घातले. त्यांचे डोळे प्रेमाश्रुंनी भरले होते.
अचानक त्यांच्या मुखी काव्य उमटले.
झाली भाग्याची उजरी| दृष्टी देखताची पंढरी||
ठेविले तो कर कटी| जेणे अवलोकिला दिठी||
चंद्रभागे केले स्नान| भक्तां पुंडलिकाचे दर्शन||
निळा म्हणे वैकुंठवासी| प्राणी होईल निश्चयेसी||
नुसते पंढरपुराच्या वेशीच्या दर्शनाने ही अवस्था. तर प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनाने तर त्यांच्या काव्यगंगेस पुरच यावा. आणि झालेही तसेच. गाभार्यात जाताच निळोबांचे भान हरपले. त्यांनी श्रीचरणांना मिठी घातली. प्रेमाश्रुंनी श्रीचरण भिजले. आणि ओठी शब्द आले:
सुकुमार साजिरे ध्यान| धरिले जघन दोन्ही करी||
विटेवरी दिव्य रुप| कोटी कंदर्प वोवाळीले||
तुळसी माळा वैजयंती| कौस्तुभ दिप्ती पदकांची||
निळा म्हणे हृदयावरी| दिली थोरी द्विजपद्मा||
हा पहा गे विटे उभा|सच्चितानंदाआ हा गाभा||
देखे सकळांचाहि भाव| अक्षय हे याचे नाव||
जेथे तेथे जैसा तैसा| नव्हे न्यून पुर्ण ऐसा||
निळा म्हणे माझ्या जिवी| ठेला जडोन तो गोसावी||
सगुण स्वरुप तुमचे हरी|शोभते हे विटेवरी||
तेणे लागली टकमक| डोळां आवडे आणिक||
मना बुद्धिसीही भुली|इंद्रिये गुंफोन राहिली||
निळा म्हणे तनुप्राण| गेली आपणा विसरोन||
निळोबाचा एक आठवडाभर मुक्काम पंढरीस होता. रोज सायंकाळी निळोबा राऊळी किर्तन करत असे.ते रसाळ किर्तन ऐकण्यास रोज गर्दी वाढु लागली.भाविक त्यांना संत निळोबाराय म्हणु लागले. लोकांची उपाधी वाढु लागली तसं निळोबांनी मुक्काम हलवण्याची तयारी केली. पंढरीच्या त्या मुक्कामात श्री पांडुरंग व त्याची पुण्यनगरी यावर निळोबांनी सुमारे दिडशे अभंग रचले.
श्री क्षेत्र आळंदीसही तोच प्रकार. श्री ज्ञानदेवांच्या समाधीवर मस्तक टेकवता निळोबांस गहिवरुन आले. आणि त्यांच्या मुखी ज्ञानेशाची स्तुती उमटली.
बोलवितां बोले वेद| म्हैसा सुबद्ध स्वरान्वये||
काय येक न करा देवा| भिंती चालवा निश्चेष्ठित||
शिष्यालागे देतां बोध| न लागे पलार्ध निमिषहि||
निळा म्हणे ज्ञानेश्वरा| मज अंगिकारा रंका दीना||
दुसरे दिवशी श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीची षोडशोपचार पूजा करुन निळोबांनी स्वरचित आरती म्हटली. नंतर तिथे त्यांचे किर्तन झाले.ते संपताच देवस्थानातर्फे माउलीचा प्रसाद म्हणुन निळोबारायास भरजरी शालजोडी पांघरण्यात आली. बिदागी म्हणुन श्रीफल व ३ सुवर्णहोन देण्यात आले. त्यांनी ते होन परत केले व म्हणाले:
कोणतीही न धरुनी आशा| भजावे जगदिशा किर्तनाते||
मग तो कृपेचा सागर| उतरील पार भवसिंधु||
तोडोनिया ममता जाळ| करील कृपाळ वरी कृपा||
निळा म्हणे आवडी त्यासी| कीर्तनापाशी तिष्ठतसे||
नंतर निळोबांनी देहुस प्रस्थान केले. त्याआधीच तुकोबांनी वैकुंठगमन केलं होतं. तेथे नारायणबुवा (तुकाराम महाराजांचे सुपुत्र), वृद्ध आईसाहेब, महाराजांचे भाऊ कान्होबाकाका यांची भेट झाली. ४० दिवस मुक्काम तेथे करुन त्यांनी तुकोबारायांचे जवळपास ४००० अभंग नकलुन काढले. तुकोबारायांची परम शिष्या संत बहिणाबाई यांची भेट तिथेच झाली. आणि तिथेच निळोबाने मनोमन तुकोबारायांना गुरु मानले. एवढच नाही तर प्रत्यक्ष त्यांच्याकडुनच अनुग्रह घेणार हा निर्धार केला. देहुवरुन आल्यापासुन निळोबांच्या मनास स्वस्थता नव्हती. "आम्हास श्री तुकारामबोवांनी अनुग्रह दिला पाहिजे" सतत हाच ध्यास.
आणि एक दिवस त्यांनी ठरवलं की आपण धरणं धरायचं. सद्गुरुंचं दर्शन होईतों अन्नपाणी त्यागुन त्यांचा जप करत बसायचं. निष्ठा पणाला लागेल, पण बघु सद्गुरु कशी कृपा करीत नाहीत ते.
झाले. निळोबा धरणं धरुन बसले.एकेक आठवडा जाउ लागला.आवाज क्षीण झाला. अशक्तपणा वाढु लागला. एक्केचाळीस दिवस झाले आणि तुकोबारायांनी स्वप्नात दृष्टांत दिला. मंत्रही दिला. त्यांची परिक्षा पहाण्यासाठी आधी श्रीहरीने त्यांना दर्शन दिले. तेव्हा निळोबांची अवस्था "रुप पाहता लोचनी| सुख झाले वो साजणी|| अशी झाली. पण ते त्यास म्हणाले,"
येथ तुजलागी बोलविले कोणी| प्रार्थिल्यावाचुनी आलासी कां||
प्रल्हादा कैवारी दैत्याते दंडाया| स्तंभी देवराया प्रगटोनी||
तैसे मज नाही बा संकट| तरी का फुकट श्रम केले||
निळा म्हणे आम्ही नोळखूच देवा| तुकयाचा धांवा करितसे||
धन्य दे निळोबा. प्रत्यक्ष भगवंताला असं म्हणाले. आणी मग भगवंताच्या ठिकाणी तुकोबाराय दिसु लागले. निळोबाने त्यांच्या पायी मस्तक ठेवले. प्रेमाश्रुंनी त्या पवित्र श्रीचरणीं अभिषेक केला. तेव्हा महाराजांनी मस्तकी हात ठेवुन म्हटले," निळोबाराय, भागवत धर्माची ध्वजा पुढे चालवा! वैराग्यवृत्तीने किर्तनद्वारा लोकांन भक्तिमार्ग दाखवा. आणि "नाम संकीर्तन साधन पै सोपे| जळतील पापे जन्मांतरे|| हा अभंग म्हणुन आपल्या गळ्यातील तुळशीची माळ काढुन निळोबांच्या गळ्यात घातली. कपाळी बुक्का लावला. सद्गुरुंनी आता आज्ञा केली,"निळोबा, आता पंचोत्री अभंग रचा"! पंचोत्री म्हणजे शंभरावर प्रेमाने दिलेले पाच जादा!
सद्गुरु दर्शनानंतर दोन महिन्यातच मैनेचं बाळंतपण झालं. मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं चंद्रभागा.
तिच्या पाठीवर दोन वर्षांनी भिवोबा जन्मला. आता घर म्हणजे देउळच झालं. संत म्हणुन निळोबांची ख्याती झाली. लोक दर्शनास येउ लागले. प्रापंचिक समस्या मांडु लागले. तेव्हा निळोबा म्हणत,
हाचि उपाव सुगम सार्|तरणे संसार जया नरा||
नाम गाता गोविंदाचे| फिटे जिवाचे जिवपण||
भुक्ति मुक्ति वोळंगे येती|अंगेचि ठाकती दया क्षमा||
नीळा म्हणे अवघी सुखे| येती हरीखे चोजवीत||
बोलता बोलता १०वर्षं सरली. मध्यंतरीच्या काळात कोंडुमामा, वारुमामी गेल्या. त्यानंतर इनामदारांच्या घरात बरीच उलथापालथ झाली. धाकटा नारबा त्याची बायको पहिल्याच बाळंतपणात गेली, मुलही गेले. तेव्हापासुन तो विरक्त झाला. एक दिवस सरळ गृहत्याग करुन काशीला गेला. पलुनाना शिरुरची व्यवस्था पहाण्यासाठी प्रपंच घेउन तिकडे गेले. पारनेरची शेतीवाडी विकली. वाडा आणि एक घर विकलं. फक्त निळोबांच्या रहात्या घराचं त्यांच्या नावे दानपत्र केलं. त्यातुन दोन वर्ष दुष्काळ पडला. मोठी दैना उडाली. घरात पीठ आहे मीठ नाही अशी अवस्था. दोन वर्षांनी वरुण राजाची कृपा झाली. थोडाफार पाऊस पडला. चंद्रभागेचं(मुलगी) लग्नाचं वय झालं होतं. त्यांचे कुलोपाध्ये शेषाचार्य पोळ, जुन्नर प्रांतीचा बाल्हे गावचे कुळकर्णी अंताजी दत्तो यांच्या ज्येष्ठ पुत्राचं माधवाचं स्थळ घेउन आले. निळोबांची सांपत्तिक स्थिती सर्वसाधारण होती. वरदक्षिणा, मानपान अशक्य होतं. शिरुरास जाउन पलुनानांना अक्षत देण्यासाठी निळोबा गेले. तर पलुनानां विषमज्वराने आजारी होते. तरी त्यांनी पैशांच्या व्यवस्थेचं विचारलं.
निळोबा उत्तरले,
निजभक्ताची आवडी| सांभाळी तो घडीघडी||
राखोनिया भुक थाअन| करी तयाचा बहुमान||
वस्त्र भूषणे पुरवी| चिंता त्याची वाहे जिवी||
निळा म्हणे त्याचे उणे| पडो नेंदी कवण्या गुणे||
मनुष्यबळ कमी, तशी सांपत्तिक स्थितीही यथातथाच. म्हणता म्हणता ८ दिवसांवर लग्न आलं आणि निजभक्ताच्या कार्यासाठी प्रत्यक्ष भगवंत उभा राहिला. साक्षात परब्रम्ह सगुणरुपाने त्यांच्या घरात राबले.
निळोबारायाने आषाढी-कार्तिकीची पंढरीची वारी सुरु केली.
एक दिवस पिंपळनेरच्या रामचंद्र पाटलांचा निरोप घेउन त्यांचा पुत्र भुलाजी आला. रामचंद्र पाटील खुप आजारी होते आणि पिंपळेश्वराच्या मंदिरात आपल्या डोळ्यासमोर निळोबांचं किर्तन व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या विनंतीचा मान ठेवुन निळोबा पिंपळनेरला आले. तब्बल एक प्रहर कीर्तनाचा थाट चालु होता. आरती झाल्यावर निळोबाने स्वहस्ते पाटलाचे कपाळी बुक्का लावला आणी पाटलांच्या दुखण्याला उतार पडला. पाटील दुखण्यातुन खडखडीत बरे झाले. आणि निळोबासारखे पुण्यवान संत आपल्या गावी कायमचे रहावे असा त्यांच्या मनात विचार आला. लगेच त्यांनी तो गावकर्यांना बोलुन दाखवला. सर्वांनी निळोबांच्या संसाराची काळजी घेण्याचं ठरलं. ओढ्याच्या अंगाला पाटलाचा वाडा होता. तो पाडुन नविन बांधकाम करुन निळोबाला रहायला द्यायचं ठरलं.
इकडे पिंपळेश्वर महादेवाने निळोबारायास सुद्धा कौल दिला. आणि ते सपरिवार पिंपळनेरास रहायला आले. निळोबाने मोठी वास्तुशांत केली. सगळे संतुष्ट झाले. तुकाराम महाराजांच्या पुण्यतिथीला गुणाजी पाथरवटाने घडवलेली तुकोबांची सुंदर मुर्ती आणली गेली. पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला. तिथे निळोबाने स्वरचित आरती म्हटली.
३र्या वर्षी पुण्यतिथीस बहिणाक्का शिउराहुन आल्या होत्या. चांगल्या महिनाभर राहिल्या होत्या.
बघता बघता १८ वर्षांचा काळ सरला. निळोबांचा संसार बहरला. भिवोबा- त्यांचा एकुलता एक लेक. त्याचे लग्न सुप्याच्या नरसोपंत देशपांड्यांच्या मुलीशी- भागीरथीशी झाले. त्याला पाठोपाठ ३ मुलगेच झाले. पहिल्या नातवाचे नाव मुकुंद, मधला गणेश, व धाकटा गोपाळा...
या पावसाळ्यात निळोबांच्या वयास ५५वर्षे पुर्ण झाली आणी वयोमानाने शारीरिक व्याधी सुरु झाल्या. निळोबास गुडघेदुखी. दुखणं असं की पावसाळी दमट हवेत जोर चढे.आणि आषाढी वारी तर ऐन पावसाळ्यात. गुढघे सुजले तरी अट्टाहासाने निळोबा दिंडीत सामिल झाले. पंढरपुरी पोचताच लोकांनी त्यांना बसुन किर्तन कराय्ची विनंती केली. पण निळोबाने उभे राहुनच किर्तन केले. सद्गुरुंच्या चरित्राचे आख्यान लावले. तिथे कासेगावचे सखाराम बाळाजी हे शिष्योत्तम मिळाले. त्यांनी निळोबांची सेवा केली. आणि एक दिवस पंढरीहुन निघण्याची तयारी झाली. जातांना परत एकदा श्रीदर्शन घ्यायचे म्हणुन सगळे गाभार्यात गेले. डबडबल्या डोळ्यांनी निळोबारायांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले, आणि गहिवरल्या स्वरात म्हणाले,"देवा,आज आपला निरोप घेतांना मन व्यथित झालं आहे. पाय थकले, यापुढे वारी होईल असे वाटत नाही. गुडघे उभं राहु देत नाहीत. असो. हे देहाचे भोग आहेत ते भोगुनच संपवीन. त्याबद्दल आपल्यावर साकडे घालत नाही. पण देवा आपले दर्शन नित्य घडावे ही मात्र तीव्र आस आहे" आणि अचानक त्यांच्या मुखी अभंग आला.
पंढरीहुनि गावी जातां|वाटे खंती पंढरीनाथा||
आता बोळवीत यावे|आमुच्या गावा आम्हासवे||
तुम्हां लागी प्राण फुटे| वियोग दु:खे पूर लोटे||
निळा म्हणे पंढरीनाथा| चला गावा आमुच्या आता||
निळोबा पिंपळनेरी परतले. नित्यक्रम सुरु झाला. दसरा झाला आणि एक दिवस निळोबांना पांडुरंगाचा दृष्टांत झाला. " आम्ही उभयतां तुमचे घरी येत आहोत. तळेगावच्या विठ्ठलवाडी डोहात आमच्या मुर्ती आहेत. त्या काढुन आणा. ओसरीवर स्थापना करा. आता पिंपळनेर हेच तुमचे पंढरपुर!"
आणि सगळे उत्साहाने तयारीस लागले. तासा दीड तासात ३०-४० माणसं दारी हजर. पांडुरंगास आणण्यासाठी गाडी सजवण्यात आली. सगळे वाजत गाजत तळेगावी गेले. तळेगावापासुन अडीच कोसावर विठ्ठलवाडी गाव. भिमा नदी अथांग वाहत होती. डोहातुन सुबक मुर्ती काढण्यात आल्या. आणि लोकांनी जल्लोष केला.वाजत गाजत मुर्ती निळोबारायांच्या घरी आणण्यात आल्या. कार्तिकीएकादशीला ओसरीवरच प्रतिष्ठापना करायचं ठरलं. दिवाळीच्या वेळेसच सगळी तयारी पुर्ण झाली. बहिणाक्कांना खास निमंत्रण पाठवण्यात आलं. पहाटेपासुन प्राणप्रतिष्ठा विधी सुरु झाला. शिरुराहुन पद्मनाभाचार्य पोळ आले होते. त्यांच्या संगे ४ वैदिक होते. वाघोलीहुन आलेले सिद्धेश्वर शास्त्रीही मदत करत होते. अपेक्षेपेक्षा बहुसंखेने भाविक आलेले पाहुन निळोबांना आनंदाचे भरते आले. त्या दिवशी त्यांनी निरुपणाचा अभंग घेतला तो असा.
भक्ताचिया गावा आला| देव परमानंदे धाला||
म्हणे नवजाय येथुनि| आता भक्तासि टाकुनि||
शीण माझा हरला भाग| गोड वाटे याचा संग||
निळा म्हणे विजयी झाले| देवा भक्त घेउनि आले||
विठोबा रखुमाई- जय जय विठोबा रखुमाई....
सर्व श्रोते भक्तिप्रेमात डोलु लागले. आणि अचानक निळोबा स्वतःभोवती गोल फिरु लागले, त्यांचे डोळे विस्फारले गेले. हात जोडुन जणु भान विसरुन स्वतःभोवती गिरक्या घेउ लागले, अभंग म्हणु लागले.
किर्तनाची आवडी मोठी| धांवे पाठी वैष्णवां||
जेथे होती नामघोषे| नाचे उल्हासे ते ठायां||
ऐकोनिया अपुली किर्ती| सुखे जगपति सुखावे||
निळा म्हणे टाळीया छंदे| डुले आनंदे सुप्रेमे||
बहिणाक्काही वारंवार भुईस डोके टेकवुन नमन करीत होत्या. त्यांच्या डोळ्यातुन प्रेमाश्रु वहात होअते.
सद्गदित स्वरात निळोबा म्हणत होते," देवा, हा काय तुमचा छंद म्हणावा! किती नाचताहात? कुंची सुटली ना! मुकुंदा, घननीळा, शामसुंदरा, हा काय यमुनातट वाटला की काय?"
निरुपणाशी विसंगत असे त्यांचे बोलणे ऐकुन श्रोते एकमेकांकडे पाहु लागले. निळोबांनी नंतर खुलास केला की तो दोष आमचा नाही. त्या लीला नाटकी श्रीहरीचा खेळ होता. तो मनमोहन बाळकृष्ण गोपवेशात येथे नाचत होता! अहाहा... काय गोजिरे रुप!
सर्वजण भान हरपुन ऐकत होते. उधळलेल्या बुक्क्यात श्रीहरीची पाऊले दिसत होती. लोकांनी त्या पावलांवर डोके ठेवले.
मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा महाप्रसाद म्हणुन मोतीचुराचे लाडु आणि एकादशीचे पारणे म्हणुन शिरापुरीचा बेत होता. लाडु नवमीलाच बांधुन झाले. मध्यान्हीस श्रीविठ्ठल रखुमाईस नैवेद्य दाखवुन आरती सुरु झाली. आणि लगेच निरोप आला की घरातलं सगळं तुप संपलय. आता पंगतीत अन्नशुद्धीलाही तुप उरलं नाही. होतं तेवढं नैवेद्याच्या पानावर घातलं. सुप्यास तुप आणायला गेलेल्या सदुचा अजुनही पत्ता नव्हता. भातावर वाढायला तुप नाही. सर्वांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला. बहिणाक्का म्हणाल्या," चिंता कशाला करता? तो ओसरीवर श्रीहरी उभा आहे ना कमरेवर हात ठेवुन! तोच सोय करील!
निळोबांना ही बातमी कळली. क्षणभर ते गंभीर झाले. नंतर हात जोडुन श्रीमुर्तीपुढे उभे राहिले. १०-१५ क्षण त्यांच्या देहाची काष्ठवत अवस्था झाली. नंतर एकदम भानावर आल्यासारखे अंग झटक्यात हलवुन निळोबा म्हणाले," चला मागील आडाकडे"
पोहरा नदीत सोडत म्हणाले,"तुपाच्या कासंड्या मागवुन घ्या"
त्यांनी "श्रीहरी, श्रीहरी' म्हणत पोहरा ओढायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य! पोहरा रवाळ तुपाने थबथबलेला! ""विठ्ठल विठ्ठल"" म्हणत पोहरा कासंडीत ओतला वर परत आडात सोडला. असे एकुन ४ पोहरे काढले,...तीन कासंड्या भरल्या.
मग सदु सुप्याहुन तूप आणील तेव्हा ४ पोहरे तूप परत आडात सोडण्याची आज्ञा देवुन निळोबा पंगतींकडे आले. पंगतीवर पंगती उठल्या. सायंकाळी निवडक गावकर्यांची पंगत बसली तेव्हा सदोबाची गाडी आली. त्याने चांगले दोन मण तूप आणले होते. गाडीचा एक बैल पान लागुन गतप्राण झाला होत म्हणुन त्याला उशीर झाला होता. मग आज्ञेप्रमाणे आधी त्याने चार पोहरे तूप आडात ओतलं.
आणि एके दिवशी दक्षिणेचे सरसुभा शहाजादा मुअज्जम याच्याकडुन सुभेदार आला. ते निळोबारायांना पिंपळनेर, वडुली, राळेगणसिद्धी ही गावे वंशपरंपरेने इनाम दिल्याचा निरोप घेउन. निळोबांनी त्यामुळे श्रीहरीच्या चिंतनात व्यत्यय येत असल्याचे सांगुन आदरपुर्वक या गोष्टीला नकार दिला. मग त्यांच्या वतीने भुलाजी पाटील यांनी व्यवहार सांभाळायचे ठरले. ४ दिवसांनी सुप्याहुन निळोबारायांस पालखीचा सरंजाम ही आला. सोबत भरजरी पोषाख आणि अलंकार. निळोबांनी विनम्रपणे सारा सरंजाम परत पाठविला.
अश्विन नवरात्र सुरु झाले आणि चवथ्याच दिवशी निरोप आला की अश्विन शु. प्रतिपदेलाच बहिणाक्कांनी देह ठेवला. निळोबांना शोक अनावर झाला.
काही दिवसानंतर कार्तिकी एकादशी साधुन पलुनानांनीही देह ठेवला. निळोबा अजुनच उदासीन राहु लागले. इनामदारी मिळुन वर्ष होत आलं होतं. पण निळोबांचं ते तंटे-बखेडे सोडवण्यात मन लागलं नाही. एका संध्याकाळी त्यांनी सुभेदारास पत्र लिहुन सनद परत केली आणि त्यांच्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरलं. पण सुभेदाराच्या आग्रहावरुन वर्षभराचा वसुल सव्वाशे होन व दोन खंडी ज्वारी घेतली. त्याच वर्षी मोठा दुष्काळ पडला. विहीरी आटल्या. अन्नाची दैना उडाली. तेव्हा त्यांनी वसुलीतले दोन खंडी ज्वारीही गोरगरीबांना द्यायला काढली. लोक गावं सोडुन परमुलुखात जाऊ लागले. गावं ओस पडली. अशा परिस्थितीत भुलाजी पाटलाचा देहांत झाला. निळोबांच्या घरातलं किडुकमिडुक संपत आलं. निळोबा पांडुरंगाला आळवत होते. आणी पुन्हा एक दिवस पंढरपुराहुन पांडुरंग 'विठाजीशेट्टी' होउन मणभर ज्वारी देउन गेला.
निळोबा आता थकत चालले होते. पंच्याहत्तरी सुरु झाली. उभं राहुन किर्तन आता कष्टप्रद होउ लागले. मग किर्तन बसुनच होउ लागलं. कामरगावी पौर्णिमेस श्रीहरीच्या मुर्तीस्थापनेवेळेस निळोबांचं किर्तन होतं. त्याला अट्टल गुन्हेगार भिमाप्पा वंजारी आला होता. त्याने महाराजांचं किर्तन ऐकुन आपला वाटमारीचा धंदा सोडला.
अलीकडे निळोबांना जास्तच अशक्तपणा वाटु लागला होता. उठता बसता आधार घ्यावा लागे. माही पौर्णिमेपासुन क्षीणता वाढली. अन्न तर जवळपास सुटलेच. थरथरत्या आवाजात ते अभंग म्हणु लागले.
तुमचे चरणी राहो मन| करा हे दान कृपेचे||
नामी तुमचे रंगो वाचा| अंगी प्रेमाचा आविर्भाव||
हृदयी राहो तुमची मुर्ती| वाचे कीर्ति पवाडे||
निळा म्हणे ठेवा ठायी| जीवभाव पायी आपुलिये||
माही अमावस्येला त्यांची अवस्था गंभीरच झाली. हालचाल मंदावली. मात्र स्मृती आणि वाणी तरतरीत होती. दुसरे दिवशी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा लागली. त्यांच्या आज्ञेप्रमाणे पहाटेच विठ्ठल्-रखुमाईची पूजा करण्यात आली. आरतीच्या वेळी थरथरत्या हातांनी निळोबा टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करत होते.
भिवोबा (मुलाने) त्यांना मांडी दिली. त्यांच्या मुखात श्रीचरणीचे तुळशीपत्र घालण्यात आले. गंगाजलही टाकण्यात आले आणि "श्रीहरी' असा त्रिवार उच्चार करत निळोबांनी देह ठेवला.
गावोगावी निरोप पाठवले गेले. दुपारपर्यंत हजार एक माणुस जमला. आवश्यक विधी होउन अंत्ययात्रा निघाली. सुप्याहुन चंदनाचे ओंडके आणले गेले. ओढ्याकाठी चिता रचली. भिवोबाने शास्त्रानुसार यथासांग विधी करुन चितेस अग्नी दिला.
डोंगराआड जाणारा भगवान सूर्यनारायण आपल्या सोनेरी किरणांनी निळोबांना अखेरची मानवंदना देत होता.....
*****************************************************
पुस्तकाचे नावः "तुमचे पायी ठेविले मन"
लेखकः नीळकंठ नांदुरकर
प्रकाशक बुकमार्क पब्लिकेशन्स, पुणे
No comments:
Post a Comment