महेश्वरची मंतरलेली पहाट!
"And, when you want something, all the universe conspires in helping you to achieve it.”
― Paulo Coelho, पॉलो कोहेलो च्या 'द अलकेमिस्ट' या पुस्तकात वारन्वार येणारे हे वाक्य आणि जवळपास
याच अर्थाचा हा ओम शान्ती ओम चा डायलॉग "कहते ही किसी चीज को अगर तुम दिल से चाहो तो, पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशीश मी लग जाती है… " ही वाक्ये प्रत्यक्षात उतरायला तसे प्रसंग घडावे लागतात.
***
महेश्वर या नावाचं भूत मानगुटीवर बसलं ते जगन्नाथ कुंटे यांच 'नर्मदे हर' वाचल्यावर.. मग सुरु झाल, इण्टरनेट वरून महेश्वर च्या नर्मदामाईचे फोटो बघत तासन तास त्यात हरवून जाणं ! ध्यासच घेतला महेश्वर ला जायचा. एक जबरदस्त गारुड होत या नावाच!
... आणि मागच्या वर्षी २०१५ डिसेंबर मध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. नविन वर्षाची सुरुवात नर्मदा किनारी करायची हे ठरवलच. महेश्वर, मान्डु, उज्जैन, इन्दौर, आणि नविन वर्षाला ओम्कारेश्वर ला असा त्रिकोण करायचा प्लॅन केला. सुट्ट्या जुळुन आल्या. नेटवरुन अन्तर मोजुन, हॉटेल्स बुकीन्ग करुन घेतल. मधेच ३-४ दिवस पुण्यात अभुतपुर्व थन्डी अचानक पडली. मनात म्हटलं, मैय्या परीक्षा घेतेय, घेऊ दे!
त्यात बडवानी हुन निरोप आला की तिथे २ डिग्री तापमान आहे. आणि नर्मदेच्या किनारी रहाणार म्हटल्यावर अजुनच थन्डी असेल. हे पाहुन आमच्या ग्रुपमधे २-४ जण गळाले.
तरी आमचा निर्धार पक्काच. काही झाल तरी जायचे...नर्मदा मैय्यावर सोपवुन. ती पाहुन घेइल. गाडीनेच जायचय ना, बरोबर गरम कपड्यान्चा स्टॉक घेउन. बहिण, तिचे मिस्टर, मी आणि माझा मुलगा..आम्ही चौघेच निघालो.
सकाळी साधारण ८ च्या सुमारात नाशिकहुन प्रस्थान केले. दुपारी बिजासन घाटात माता बिजासनीचे दर्शन घेउन
सन्ध्याकाळी ६ च्या सुमारास महेश्वरला पोहोचलो.
महेश्वर नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. अहिल्यादेवी होळकर यान्च हे टुमदार गाव. होळकर पॅलेसच्या आवारातच होटेल होते. हॉटेल मैय्या किनारी, मैय्याचे सतत दर्शन होईल अशा तर्हेने बुक केले होते.
गम्मत म्हणजे तिथे अजिबात थन्डी नव्हती. मैय्याने आमची 'हाक' ऐकुन 'ओ; दिली होती. सन्ध्याकाळी जवळच्या राजराजेश्वर मन्दिरात जाउन आलो. मंदिरात अहिल्यादेवींच्या काळापासून तेवत असलेले भलेमोठे 11 दगडी दिवे... साजूक तुपाचे! पाहूनच मन भरून गेले. घाटावर ही चक्कर मारली. इथला घाट अतिशय सुंदर..घडीव पायऱयांचा... प्रचंड आकाराचा!
घाटावरची गर्दी कमी झाली होती. एखादा दुसरा परिक्रमावासी, 2-3 साधू, 2- 3 पुजारी इतकेच तुरळक लोक. अंधार पडायला सुरुवात झाली होती मात्र पलीकडचा काठ उजळून निघाला होता. होळकर राजवाड्यात त्या 2-3 दिवसात कुणी कन्येचे लग्न होते.पलीकडच्या काठावर लग्नाचं शाही वर्हाड उतरले होते. त्यांचे पन्नासेक तंबू दिसत होते. आणि त्या तंबुवर लागलेले लाईट्स ची असंख्य प्रतिबिंब पाण्यात हेलकावत होती. आमच्याजवळच कुणी एक स्त्री घाटावर येऊन मैय्याच्या पात्रात दिवे सोडत होती.आकाशातही एकेक नक्षत्र उगवत होते आणि माईचा चमचमता पदर अधिक खुलून दिसत होता. कुणी एक स्त्री घाटावर येऊन मैय्याच्या पात्रात दिवे सोडत होती. त्या दिवे सोडणार्या स्त्रीला आम्ही ," इथे पहाटे स्त्रिया येतात का स्नानाला? काही भीती नाही ना? वै वै पांढरपेशी प्रश्न विचारले. त्यावर तिचा प्रतिसाद आश्वासक होता.
भल्या पहाटे उठुन मैय्यावर स्नानाला निदान दर्शनाला जायच ठरवल खर... पण पहाटेच्या थन्डीत उठावेसे वाटेना. हो नाही चालु होते.शेवटी बहिणीने जोर लावुन धरला. ६ वाजता मैय्याच्या प्रशस्त निर्मनुष्य घाटावर आम्ही चौघे पोहोचलो.
आता मैय्या सोबतीला होती.भीतीचा प्रश्न नव्हता. इथली मैय्या अगदी संथ, शांत! जलतत्वांच अस हे अजिबात आवाज न करणार रूप माझ्यासाठी नवीन होतं. संपूर्ण पात्रभर पांढराशुभ्र धुक्याचा पडदा!उजाडल्याशिवाय हा पडदा उठणार नव्हता. आधी थोडेसे लांब बसून अंदाज घेतला. मग मैय्यापासून अगदी एक फुटावर कुडकुडत बसलो. अजूनही थंड पाण्यात पाय टाकायचे धारिष्ट होत नव्हते. मैय्या म्हणजे तीर्थजननी.. तिला भेटायला जायचे म्हणजे आधी पाय कसा लावायचा? हा विचार करून आधी त्या जलतत्वाला नमस्कार केला. हळूच आधी हात बुडवून ते पाणी प्रोक्षण केले.. ' नर्मदे हर' म्हणत माथ्यावर शिंपडले. आणि मग हळूच तळवे जलात सरकवले.. आश्चर्य! मैयाचे जल अगदीच काही थंडगार नव्हते. एक सुखद लहर शरीरातून... मऊशार पाणी तळव्यांना गुदगुल्या करतंय! एवढ्या अंधारातही मैय्याचा तळ आता स्पष्ट दिसतोय.छोटे छोटे मासे आणि त्यातही काही झपकन ट्युबलाईट पेटावी असे प्रकाशमय मासे.. पायाला लुचू लागलेत.या सुखानुभवात आपोआप डोळे मिटले गेले. हाच का तो शाश्वत आनंद? आतापर्यंत आनंदाचे क्षण का कमी आलेत? मुलगा झाला तो आनंद, नोकरी लागली तो आनंद, पगार वाढला, आत्मनिर्भर झालो हा आनंद ...किती काळ टिकला? मग शाश्वत आनंद कशात?
डोळे मिटले की दृष्टी 'आत' वळते म्हणतात. अचानक आठवलं आपले महाराजांच्या चरित्रात पण महेश्वर चा उल्लेख आहे ना? इथूनच गेले असतील का श्रीमहाराज? कदाचित इथेच बसून या मैय्याच्या साक्षीनेच त्यांनी आत्मसमाधी लावली असेल का? अंगावर रोमांच उठले.नकळत डोळे भरून आले.माझ्याही नकळत हे जलतत्व आता अंतर्यामी उतरू लागलेय. माझे सद्गुरु ज्या ज्या ठिकाणी फिरले अश्या तुझ्या किनारी तूच भेटायला बोलवतेस, मैय्या! हे तूच घडवून आणतेस!
तरीही हे मन वेडं असत ग! हे असे परमानंदाचे क्षण सोडून, सुख-दु:खाच्या हेलकाव्यात क्षणात आनंदित तर क्षणात चिंतीत तर कधी साशंक होत. आपल्या जीवनाचा हेतूच अजून लक्षात येत नाहीये. "
तिच्या उसळत्या पाण्याचा खळखळाट आता स्पष्ट ऐकू येतोय. जणू गिरक्या घेत मला ती म्हणतेय, किती ' साठवून' ठेवतेस आत? मी बघ मागचं सगळं विसरून कशी पुढेच धाव घेते. तुम्ही कधी काळी धुवून टाकलेले सगळे राग, लोभ, द्वेष ,मत्सर पोटात घालूनही कशी नितळ राहाते! ते पाण्यावर वहात चाललेलं पान दिसतय तुला?? किती मजेत चाललय! आहे का त्याला उद्याची चिंता कि भूतकाळातली संवेदना? प्रवाहाचा झोत आला की जोरजोरात उसळी घ्यायचं आणि संथ असेल तेव्हा मजेत पाण्यावर पहुडायचं. मधेच एखादी खडक आला की एक गिरकी घेऊन आपल्याच मस्तीत झोकुन द्यायचं! बघ, अस जगता येईल तुला?"
डोळ्यातुन धारा सुरु झाल्या होत्या.
"माई, तुझे किती उपकार!! सगळा संभ्रम दूर केलास! तू घडवून आणले म्हणून ही तीर्थयात्रा.. आम्ही फक्त तुझी इच्छा करायची. तुझ्या सान्निध्यात आलं की कुठलीही इच्छा करा.. मग ती ऐहिक असो कि पारमार्थिक , तू त्या पूर्ण करतेस. कशी होऊ त्याची उतराई??
आता हे जलतत्व चक्क बोलतंय माझ्याशी!
ती: मी जे मागेन ते देशील?
मी: खरंच! तुला जे हवे ते! हा देह देऊ? आता या क्षणी मृत्यू जरी समोर आला तरी आनंदाने पत्करेन मी.
ती: हाहा, तो पंचमहाभूतांकडून उसना घेतलेला देह मलाच परत करून काय साधणार?
मला जे हवंय ते दुसरंच!
मी: सांग मैय्या, काय आहे माझ्याकडे देण्यासारखं! जर हा देह, हा श्वास देखील त्या परम ईश्वराने दिलाय तर मी काय देऊ तुला?
ती: हे सगळं खरं असलं तरी एक गोष्ट आहे तुझी स्वतःची.
तुझा अहं, तुझा 'मी' पणा देऊ शकतेस तू??
मी: ( थोडं थांबून) धत! एवढंच ना, हा बघ दिला. एवढा माझा जप राहिलाय तो झाला की लगेच....
ती: ( खळखळुन हसत) हाहाहा ... म्हणजे अजूनही 'तू स्वतःच' जप' करतेस असं तुला वाटतय???
मी अवाक!निर्बुद्धपणे पहातच राहिले...
मनातले उसळते जल शांत झाले होते. हलकेच डोळे उघडले. काल संध्याकाळी आलेली तीच स्त्री पुन्हा मैय्याच्या पात्रात दिवे सोडत होती.हे दिवे आणि पलीकडच्या तिरावरचे अश्या असंख्य दिव्यांनी मैय्याचे पात्र उजळून गेले होते. नकळत हात जोडले गेले!
दूरवरून राजराजेश्वर मंदिरात होत असलेल्या आरतीचा आणि घंटेचा आवाज हे मंगलमय वातावरण अधिकच अधोरेखित करत होता!
पूर्वक्षितिजावर लाल गुलाबी रंग दिसू लागला होता.
....आणि मैय्या?
मैय्या खळखळत आपल्याच मस्तीत वाहत होती. मैय्याच्या पात्रावरचा धुक्याचा पडदा हळूहळु विरत होता!
आणि ...
मनातलाही!
खूप आवडल म्हणजे नर्मदा मैया ला भेटायची इच्छ्चा झाली
ReplyDeleteThank you, Jayashri Tai! __/\__ इच्छा झाली म्हणजे मैय्याने बोलवलय! :)
Delete