शब्दफुले वेचतांना....

Monday, 31 October 2011

...का आस गुंतण्याची श्वासास अजुनी?

चालायचाच आहे मज सायास अजुनी
दिशाहीन चालला आहे प्रवास अजुनी

घास अडतो अजूनही ओठात कुणावाचून
कुणाच्या येण्याचा आहे ध्यास अजुनी

रिता असेल का कुणाचा समुद्र पुनवेला
सांगावा धाडावा वाटते पावसास अजुनी?

तुला मिळतील इथे निखारे नेहमीच
येती स्वप्ने मज समजावयास अजुनी

लक्षदीप उजळले होते त्यांनी अंगणी
कवटाळून मनातल्या अंधारास अजुनी

तुळशीपाशी मिणमिणती पणती इथे
तेवढाच दिलासा जगण्यास अजुनी

सुटता सुटत नाही वेदनांची उकल
का आस गुंतण्याची श्वासास अजुनी

No comments:

Post a Comment