शब्दफुले वेचतांना....

Tuesday, 29 November 2011

चरैवेति चरैवेति!




डार्वीनचा सिद्धांत,
बळी तो कान पिळी
आणखी काय?
सगळेच मंतरलेले...
कशासाठी पोटासाठी?
टीचभर खळगीसाठी!
पळा पळा कोण पुढे पळे तो...
चरैवेति चरैवेति!
लांबच लांब रांगा..
मुंग्या, मुंग्या...असंख्य मुंग्या!
अबब...केवढी ती लोकसंख्या!
घड्याळाची टिकटीक
थेंब थेंब पाणी, लोकलची हाक
टिफीन..अभ्यास!
स्वयंपाक, पाहुणे..!
मुलं ... नातवंडं!
माझा तु, माझा संसार
माझं माझं ..माझं
माझ्यामाझ्यात मश्गुल मी

हुश्श! दमलो बुवा...
केवढा हा प्रवास!

दोन श्वासातलं अंतर्...जीवन मृत्यु!
देवघरात
समईतल्या मंद मंद
थरारतात वाती...
अंतिम श्वास...
कलंडली मान, उघड्या मुठी!
संपलं सारं!
म्हणावे आता..जन पळभर...!


साठा उत्तराची कहाणी
पाचा उत्तरी
सुफळ संपुर्ण!

Monday, 14 November 2011

कप्पा

परवा...अगदी परवाच
आवरले ना सगळे कप्पे!
सगळं घर, एकूणएक कप्पा
कसा लख्ख केला होता!

तो तळातला कप्पा
कसा नजरेतुन सुटला कोण जाणे!

काय असेल बरं त्यात?
हं, एका शेल्फावर आहेत...
काही आठवणी बासनात गुंडाळलेल्या!
आणि
एका रांजणात आहेत..
थोडे फार वाट्याला आलेले ओले, हळवे क्षण
पुष्कळशा कडु-गोड, बोचर्‍या पण
धुळ खात पडलेल्या
असेल आठवणींच गाठोडं!

आणि काही फ्रेम्स, प्रतिमा
पालथ्या मारलेल्या... !

जाऊ दे, मनाचा तो कप्पा
आता कायमचा बंदच करुन ठेवणार आहे मी!
उगाच तुझ्या विचारांची धुळ उडुन
तुझीच प्रतिमा खराब व्हायला नको!

Monday, 31 October 2011

...का आस गुंतण्याची श्वासास अजुनी?

चालायचाच आहे मज सायास अजुनी
दिशाहीन चालला आहे प्रवास अजुनी

घास अडतो अजूनही ओठात कुणावाचून
कुणाच्या येण्याचा आहे ध्यास अजुनी

रिता असेल का कुणाचा समुद्र पुनवेला
सांगावा धाडावा वाटते पावसास अजुनी?

तुला मिळतील इथे निखारे नेहमीच
येती स्वप्ने मज समजावयास अजुनी

लक्षदीप उजळले होते त्यांनी अंगणी
कवटाळून मनातल्या अंधारास अजुनी

तुळशीपाशी मिणमिणती पणती इथे
तेवढाच दिलासा जगण्यास अजुनी

सुटता सुटत नाही वेदनांची उकल
का आस गुंतण्याची श्वासास अजुनी

Friday, 21 October 2011

..इथे तर श्वास सुटण्यासाठी आसुसलेला!




कुणा झाडावर असेल चांदण्याची पखरण
इथे तर अजुनही वैशाखाचं ऊन रणरण

कुणाच्या असेल दारात मोगरा बहरलेला
माझ्या अंगणी तर निवडुंगच शेफारलेला

कुणी असेल सखीसोबत गात तराणे
इथे तर आसवांसोबत आयुष्याचे वाहणे

कुणाची असतील पाळं मुळं पसरलेली
इथे निष्पर्ण झाडे अधांतरी लटकलेली

कुणाचा असेल कुणात जीव गुंतलेला
इथे तर श्वास सुटण्यासाठी आसुसलेला




-'जालवाणी' दिवाळी अंकात पुर्वप्रकाशित

Tuesday, 18 October 2011

जरा विसावू या वळणावर.... - अर्थात माजी विद्यार्थी संमेलन, सावित्रीबाई फुले विद्यालय,

नमस्कार मंडळी!
कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर
या वळणावर . . . . . . . . . .
 सुमारे २७ वर्षांनंतर भेटलेले एसपीएमव्हीकर्स ..त्यांच्या आठवणी.. त्याचा हा वृत्तांत!
तसं पाहिलं तर ह्या गेटटुगेदरची नांदी दोन महिन्यापुर्वी झाली.ऑगस्टच्या १० तारखेला राहुलने पुण्यातले आणि जे मिळाले ते इमेल आय्डी घेउन मेलवरुन एक पिल्लु सोडलं होतं.ते पिल्लु डोक्यात वळवळत असल्याने आम्ही उत्साहाने गेट टुगेदरसाठी होकार दिला खरा.पण पहिल्याच मिटींगमधे माझा उत्साह डळमळीत होऊ लागला.राहुल रहातो पुण्याच्या एका टोकाला... नि संजय मोरे नि मी एका टोकाला.पहिल्याच मिटींगला ,राहुलच्या घरुन निघतांना ७.३०-८ वाजले. ननु मोरे उर्फ संजु याने मला आडनाव बंधुत्वाला जागुन सांगवीत पाण्याच्या टाकीजवळ भर पावसात सोडले. त्यामुळे  दुसर्या मिटींगला जायच्या नावानेच मला अंगावर काटा आला.
अर्थात त्यानंतरच्या मिटींगांना घरी काही घरगुती कार्य निघाल्याने मी अटेंड केल्याच नाही.तिथेच राहुल नि संजु एकांड्या शिलेदारासारखी कामं करणार हे स्पष्ट झाले. होता होता ९ ऑक्टो. ही तारीख ठरली.
प्रत्यक्ष गेट टुगेदरच्या आधी २-३ दिवस सगळ्यांना फोन करुन पुन:पुन्हा बजावण्यात गेले.शनिवारी दुपारी ऑफीसातच निलुचा फोन आला की आम्ही(ती आणि विजयमाला) संगमनेरहुन निघालोय. निलिमा दोन दिवस आधीच कुटुंबासहीत पुण्यात आली होती.मी व सुरेखाची वर्णी मग त्यांच्यासोबत लागली.सुमारे ११-११.१५ च्या सुमारास सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या 'घाडगे बॉटॅनिकल फार्म" ला पोहोचलो.
बाहेरच 'जलेबी बाई'च्या गाण्याचा ताल ऐकु आला...तेव्हाच जेवणात जिलेबी असणार याची कुणकुण आम्हाला लागली.यंट्री केल्यावर हशा,टाळ्यांचे चित्कार ऐकु आले आणी दोन वर्षांपुर्वी भेटलेले एकेक चेहरे दिसु लागले. नाष्ट्याच्या प्लेसजवळ 'अय्या',कुठे होतीस्", "हाय कशी आहेस?" '" मी किती जाड, तु किती बारीक" असे चित्कार ऐकु आले. तिथे महिलामंडळ असणार हे समजुन आलं! जवळ गेल्यावर दिसलं की मंटी तारस्वरात काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. नूतन फोनवर तर गुलाबी साडीतली एक स्त्री नाष्टा करण्यात मग्न होती. तशा अजुनही स्त्रीया तिथे मुलांना घेउन नाष्टा करत होत्या.पण त्या काही ओळखु आल्या नाही.पुरुषांच्या ग्रुपकडुन हशां,टाळ्यासहीत "हायला' "च्यायला', "साल्या' असं काय काय ऐकु आल्यावर आम्ही कानावर हात ठेवले. त्यांचा प्लॅन माझ्या लगेच लक्षात आला..त्यांनी आपापल्या अर्धांगाला मुलांसोबत सोपवुन त्यांना नाष्ट्याच्या कंटाळवाण्या कार्यक्रमात गुंतवले होते आणि स्वतः लॉनमधे कुजबुजत टाळ्या देत काहीतरी सिक्रेटसची देवाण घेवाण करण्यात मग्न होते.
मी मंटीला २५ वर्षांनी भेटत होते...कडकडुन मिठ्या मारल्या.समोर बसलेली गुलाबी साडीतली सुनंदा पहिल्या प्रथम ओळखली नाही.पण नंतर तिचं ते ठासुन बोलणं,उंच कपाळ यावरुन डोक्यात प्रकाश पडला की हीच सुनंदा!  नाष्टा चालु असतांना मृदुलाचा फोन आला...नि पुढचा सुमारे अर्धा तास तो फोन ह्या कानापासुन त्या कानापर्यंत फिरत होता....अर्थात वेगवेगळ्या व्यक्तींच्या!खुप मिस करत होती ती सर्वांनाच!आमच्या मागेच निलिमा, विजयमाला होत्या. निलिमाला मी दुसर्यांदा भेटत असल्याने मिठ्या-बिठ्यांचा कार्यक्रम केला नाही.
नंतर आमचे वर्गमित्र पण तिथं आले. सगळ्यांनाच सर्वात भेटण्याची उत्सुकता होती ती 'सुनंदा'ला. औपचारीक ओळखी अशा पद्धतीने झाल्या.
प्रक्षेपनं आधी मला "ओळख पाहु"म्हणत “रवि कदम”,”सुहास कदम”अशी नावं सांगुन खुप कुठे कुठे फिरवुन आणले.त्याचं उट्टं मी पुढच्या गेट टुगेदरला नक्कीच काढणार आहे.नाष्टा झाल्यावर सर्वांना मोठ्या हॉलमधे जायची मॉनीटरने सूचना दिली.सगळ्यांनी मधला लॉनचा पॅसेज ओलांडुन हॉलकडे कूच केले.तिकडे जातांना कुणी कल्पनाही केली नसेल की, पुढचे २ तास त्यांचे पुर्ण हास्यकल्लोळात बुडुन जाणार आहेत.
हॉलमधे सगळे गोलाकार बसल्यावर 'राहुल-द मॉनिटर'म्हणत होता की सगळे फळ्याकडे तोंड करुन बसु...मग ओळखी करु.संजु(मोरे)ने प्रस्ताव मांडला की आपण आपापली ओळख करुन द्यावी.मग कुणीतरी मधेच पचकलं की आपण स्वतःची ओळख करुन देण्याऐवजी दुसर्यांनी त्याची ओळख करुन द्यावी.तेवढ्यात प्रक्षेपच्या डोक्यात ट्युबलाईट पेटली आणि त्याने आक्षेप घेतला की सर्वांच्या विशेषतः पुरुष मंडळींच्या बेटर हाफ बरोबर आहेत तर काही उखाळ्या पाखाळ्या निघुन २०-२५ वर्षांपासुन 'बंद मुठ्ठी' उघडतील.कुणीतरी त्यावर म्हणालं की अरे, हाच तर खरा चान्स आहे, बदल करायचा. नक्की काय बदल करणं अपेक्षित होतं हे मला शेवटपर्यंत कळ्ळं नाही.
सर्वांनी फॅमिलीला बरोबर आणायचं राहुल ने विचारपुर्वक ठरवलं होतं. त्यामुळे वर्गमित्र 'शांततेत' होते. तशा त्यांच्या बायका तयारीनेच आल्या होत्या आणि डोळ्यात (कि कानात?)प्राण आणुन ऐकत होत्या...न जाणो (इथे तरी)आपल्या नवर्‍याचं बिंग फुटलं तर काहीतरी ऐकायला मिळेल.
इथे मधली सुमारे २८ वर्ष औपचारीकतेच्या बुरख्याबरोबरच गळुन पडली.सगळे नंतर शिस्तीत फळ्याकडे तोंड करुन बसले.मला नेहमीप्रमाणे पहिल्या बेंचवर म्हणजे पुढेच जागा मिळाली. प्रत्येकाने नाव गाव, शाळा सोडल्यानंतर काय काय उद्योगधंदे केले ई.ई. बोलायचं नि सर्वात शेवटी शाळेतला एखादी अनुभव सांगायचा असं ठरलं.
सर्वात आधी उभा राहिला,संजय मोरे.संजुने छान सोप्या शब्दांत त्याची ओळख करुन दिली.सुरेखशी झालेली जबरदस्त टक्करही त्याला आठवली.माधव अहिरे बी.जे.च्या हॉस्टेलला असतांना ते कसे त्याच्या रुमवर पडीक असायचे ही त्याने आठवण करुन दिली.
नंतर माझं नाव पुकारलं गेलं.वर्गात डोकं खाली करुन लिहित असतांना अचानक शिवथरे सरांनी नाव पुकारावं नि आपण दचकुन लटलट कापत उभ रहावं तशी परिस्थिती माझी झाली. उभं रहातांनाच काय बोलायचं त्याची उजळणी केली.. चौथीत असतांना माधवने मधल्या सुट्टीत शाळेच्या स्टेजवरुन पळतांना पाठीत बुक्की दिली होती. त्या बुक्कीची जखम इतकी खोलवर होती की आता सुमारे ३५ वर्षांनंतरही ते मला आठवलं..म्हणजे बघा! तेव्हा प्रक्षेप म्हणाला की त्याची परतफेड कर..मग राहुलने टिप्पणी केली की 'व्याजासहीत' परत कर. यावर तिथल्या तिथेच १९७६ ते २०११ अशा ३५ वर्षांच्या ३५ बुक्क्या + व्याज वै. धरुन ५०एक बुक्क्यांचा हिशेब मी केला होता पण त्याची बायको, मुली तिथे पाहुन हात आणि मनाला आवर घातला..पण पुढे-मागे कुठल्याही गेट टुगेदरला याची परतफेड करायचीच असं स्वतःला बजावुन ठेवलं.
७वीत/८वीत असतांना,फौंटन पेन गळत असेल तर त्याला कागद गुंडाळुन लिहायची फ्याशन होती.त्याप्रमाणे मी लिहित असतांना साबळे सर म्हणाले होते की,'अरे व्वा,नयनाचा पेन कपडे घालतो"!!ही आठवण सांगितली तेव्हा सगळे जबरदस्तीने हसल्यासारखे हसले.खरं तर यात हसण्यासारखं काही नव्हतं..पण मॉनीटरने मुलांना आधीच तंबी दिल्याचं मला नंतर कळलं.
नंतर सामटिव्हीदंडमंडीत आसावरी बोलायला उठली.तिनेही शाळेच्या छान छान आठवणी सांगितल्या.आसावरी बोलायला उभी राहिल्याबरोबर आधी तिने महेशला उठवले नि म्हणाली की याच्याकडे बघा, याला मी रोज सायकल वर "प्रॉजेक्ट'वरुन डबलसीट आणत होते. तेव्हा सगळे म्हणाले की, याची परतफेड म्हणुन आता महेशने तिला डबलसीट सायकलवरुन घेउन जावे. पुढच्या वर्षी विद्यापीठात होणार्‍या गेट टुगेदरला हा परतफेडीचा प्रोग्रॅम होणार आहे.
दापोलीचे प्रा. माने उभे राहिले. हा बोलायला उठला, ते थांबायचं नावच घेत नव्हता. माझ्याशेजारी बसलेल्या संजय मोरेच्या बायकोला मी विचारले,'हा प्राध्यापक आहे काय?'तर ती म्हणाली,"हो ना,४५ मिनिटे झाल्याशिवाय थांबणार नाही तो. मग मी ही म्हटले," तास संपल्याची घंटा वाजवावी काय?
प्रक्षेप : हे महाशय बायकोजवळ उभं रहायला इतका का घाबरत होते हे मला शेवटपर्यंत कळ्ळं नाही. तो जर्रा अंतर ठेवुनच उभा राहिला होता...मग राहुल ने त्यांना फ्यामिली फोटोसाठी जवळ या असं सांगितलं.तेव्हा धीर करुन तो उभा राहिला. त्याने सायन्सच्या तांबे सरांची, अंडे आणि पिल्लुची आठवण सांगितली.
नंतर उठला संजय. तो आणि  माने बेंचवर शेजारी बसायचे तेव्हा भापकर सर कसे दोघांना," महानंद आणि अलकनंद" अशी हाक मारत ते सांगितले.आणि राहुलकडे इंद्रजाल वै.कॉमिक्स वाचण्यासाठी जात असल्याचं सांगितले. दिवाळीचा होमवर्क न केल्याबद्दल क्षेत्रे म्याडम ने त्याला ३०० उठाबशा काढायला लावल्या आणि त्यामुळे ८ दिवस तो चालु शकला नव्हता हे ही त्याला आठवले. संघवी दिपकची आठवण सांगतांना शेवटी म्हणाला की एक म्हण पुर्ण करायला सरांनी सांगितली होती. "साखरेचे खाणार त्याला.... " तर या महाभागाने " .....त्याला गुळ कोण देणार' असे सांगितले होते.
नंतर डॉ.माधव उभे राहिले.त्यांनी बी.जे.ला असतांना त्याच्या रुमवर कसे सगळे मित्र पडीक असायचे ते सांगितले.नंतर,मढीकर सरांच्या इंग्रजीच्या तासाला ते पुस्तक धरुन कसे उभे रहायचे ते प्रात्यक्षिक करुन दाखवले.आणि असे उभे राहिल्यावर पहिल्या बेंचवर बसलेले माधव नि...सरांच्या दुसर्या हाताच्या बोटांवर शाईचे थेंब कसे ओतायचे हे सांगुन आपणही काही कमी नव्हतो हे दाखवले.आणि मग एकदा सरांच्या लक्षात आल्यावर ते 'दिव्याखाली अंधार' असं काहीसं म्हणाल्याचं ही त्याला आठवलं!
प्रा. साळेंनी भापकर सरांच्या होकायंत्राची आठवण सांगितली.साळेने एकबोटे सरांची आठवण सांगतांना म्हणाला की बी.एस्सी अ‍ॅग्रीच्या व्हायव्हाला एक्स्टर्नल सर म्हणुन एकबोटे सर येणार म्हटल्यावर तो खुश झाला होता आणि काहीही अभ्यास न करता गेला होता.प्रत्यक्ष व्हायव्हाच्या वेळेस,एकबोटे सरांनी प्रश्न विचारल्यावर त्याने फक्त "मी राहुलचा मित्र आहे'".एवढच उत्तर दिल्यावर एकबोटे सर छानसे हसले होते...स्काऊटच्या कॅम्पला भज्या तळायची हौस आली तर म्हणे भज्यांच्या पीठात अंडी टाकुन तळल्या.आणि राहुलसारख्या व्हेजींना खाउ घातल्या.
साळेने इच्छा प्रदर्शित केली की ,आपण आता एकत्र जमलोच आहोत तर असं काही कार्य करुया की एकमेकांच्या आपण उपयोगी पडु.आपण तर सर्व सेटल आहोतच,पण आपल्या मुलांनाही काही गरज लागली तर एकमेकांना मदत करुया.
सुहास ही पण एक हसतमुख असामी.पर्सनॅलिटी अशी की हा ही मला पहिल्यांदा राजकारणात आहे असेच वाटले. त्याने पण मजेदार आठवणी सांगुन रंगत आणली.
कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
नंतर उठला राजकुमार भिंगार्डे! हा उभा राहिल्यावर तर मला वाटले की इलेक्शन क्यांपेनलाच कुणी उभा आहे. आणि आता म्हणेल," नयना ताई, विसरु नका बरं ! आपला पक्ष... ! राजकुमारची मस्त आठवणः माधव आणि राजकुमारला घाम फार यायचा.त्यांनी पमानकरकडे हातरुमाल मागितला तर त्याने दिला नाही म्हणुन यांनी त्याचं लक्ष नसतांना गुपचुप त्याच्या खिशातुन काढला.आता तो घाम पुसुन परत जागच्या जागी ठेवावा ना, तर नाही. या टारगटांनी तो वर फॅनवर टाकला.झालं !प्रविणच्या लक्षात आल्यावर त्याने शेवाळे सरांना नाव सांगितले,की कुणीतरी त्याचा रुमाल फॅनवर टाकला. आणि सरांनी नेमके राजकुमारलाच बेंचवर चढुन रुमाल काढायला सांगितले.
मग आपले स्पोर्टस मास्तर मजिद उभे राहिले. आख्ख्या १५ मिनिटाच्या भाषणात मला फक्त एवढेच कळले की:
१. त्याच्या कॉमेंट्रीची किर्ती आख्ख्या एसपीएमव्ही मधे पसरली होती.
२. तो आता पुणे जिल्ह्यातल्या अ‍ॅथलेटीक्सचा हेड कोच आहे.पोरांना घडवतो.
३. त्याच्या स्टुडंट्सने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकं मिळवली आहेत.
४. मढीकर सर, साबळे सरांमुळे त्याचं इंग्रजी एवढं पक्क झालं की तो सगळा इंटरनॅशनल करस्पाँडन्स एकटा हाताळतो.
५. कमी शिकलेली एसपीएमव्हीची मुले सुद्धा आपापल्या क्षेत्रात टॉपवर आहेत. हेच आहे एसपीएमव्हीचे संस्कार.

नंतर मॉनिटर राहुल त्याच्या फॅमिलीसहीत उभा राहिला.राहुलने आठवण सांगितली...की प्राथमिक शाळेच्या पाण्याच्या टाकीजवळ एका खड्ड्यात पाण्यात तो कसा पडला आणि कदम सरांनी त्याला मानगुटीला धरुन मांजरासारखं कसं बाहेर काढलं हे राहुलला आठवलं तसच तो एका रविवारी केंजळेबरोबर बॉम्बे कॉलनीजवळ मटणाची दुकानं होती, तिथे मटण कसं करतात याची पुर्ण प्रोसिजर पहायला गेला होता. पण त्यानंतर देशीविदेशी फिरुन देखील त्याची नॉनव्हेज खाण्याची कधीच इच्छा झाली नाही.. हे ही नमुद केलं!  
नंतर आला सुनिल राऊत! शेवाळे सरांची आठवण सांगतांना तो म्हणाला की सर नेहमी म्हणायचे," तुम्ही मुळा डॅमला रहातात ना! कधीतरी डॅमवर जा. मेंदु बाहेर काढा, दगडावर घासुन पुन्हा डोक्यात फीट करा."
डॉ. दिपकला खुप काही काही आठवत होते. त्याने मजा सांगितली...की गृहपाठ कधीच पुर्ण नसायचा. म्हणुन हे दोघं तिघं 'उगळे'ची कम्प्लीट असलेली वहीच वरचं पान फाडुन आणि स्वतःचं नाव टाकुन पुढे करायचे.पण एकदा,एकाकडुन वही दुसर्‍याकडे पास झालीच नाही... तेव्हा दिपकला मार बसला.
सुयोग जोशीला तर अनेक गोष्टी आठवतच नव्हत्या  म्हणुन त्याने कागदावर लिहुनच आणले होते.
मधुकर लोंढे:हे गृहस्थ जरा खात्या पित्या घरचे वाटत होते.बोलायला उभे राहिले तेव्हा इतरांची बोलतीच बंद केली.त्यांच्याही आठवणीप्रमाणे ते ब्याक बेंचर होते.११वी १२वीत असतांना मागच्या मागे पळुन जाऊन शाळेशेजारी असलेल्या पेरुच्या बागेत उरलेला अभ्यास करायचे म्हणे.आणि एकदा तर पेरु आणुन वर्गात खात असतांना भापकर सरच मागे येउन उभे राहिले.गायकवाड खिशात मीठ मिरचीच्या पुड्या ठेवत असे.मागच्या बेंचवरचे ६ जण एकदम क्लास बुडवुन बागेत पळायचे.
कुणालाही कल्पना नसेल पण बाळू घाडगेने आठवणींची पोतडीच आणली होती.त्याने त्यातुन एकेक आठवणी बाहेर काढायला सुरुवात केली नि सगळे पोट धरुन हसत होते...डॅमच्या बसमधे येणारे मुले बहुतेक टारगटच होती.आणि बसमधल्या मुलांची लक्तरे काढायची त्यांची सवय.बाळुला जबरदस्त भूक लागायची (तसं त्याच्याकडे बघुन वाटत नाही) म्हणुन त्याचा दोन ताली डबा असायचा..भाजी भाकरीचा.  लास्ट बेंचवर बसायचा...पण जेव्हापासुन आसावरी आली आणि आसावरी व रेखा दोघी यांच्या लायनीत एका बेंचवर बसायच्या तेव्हा या पोरांना त्यांची फार दहशत वाटायची. एकदा याने दोघींची बेंचवर बसतांना उडणारी तारांबळ पाहुन,'तुम्ही वन बाय वन बसा' असं म्हटल्यावर आसावरीने डोळे वटारले होते हे ही सांगितले.राहुलच्या नीट लावलेल्या दफ्तराकडे पाहुन त्याचा हेवा वाटायचा.बी जे मेडीकलला माधव अहिरे असतांना त्याच्या नावावर कितीतरी वेळेस मेसमधे जेवण हे सगळं त्याला आठवलं.
निलीमा पाटीलः निलुने आणि तिच्या नवर्‍याने ओळख करुन दिल्याबरोबर कुणीतरी मागे बसलेलं पचकलं की," हिच्यामुळे केस पांढरे झाले का हो?".तशी निलु एकदम गोरी मोरी झाली.तिने खुप आठवणी सांगितल्या.राष्ट्रीय सणांच्या वेळेस नानकटाई पॅकींगसाठी बेकरीत नेले जायचे. शेवाळे सर, ज्ञानदेवी बल्लाळ आणि शारदा.. यांना नेहमी म्हणायचे,"बघा,नाव ज्ञानदेवी,आणि ज्ञानाचा पत्ता नाही."!मंटीकडे जायला कंपाउंडच्या भिंतीवरुन उड्या मारुन जायचो. पण तिथे गेल्यावर मंटी "आई झोपलेली आहे, आवाज नका करु" असं म्हणुन सर्वांना गप्प करायची. प्राथमिक शाळेच्या मागे कार्यानुभवच्या तासाला मागे भाजीपाला लावला होता.निलिमा म्हणाली की डॅमच्या बसमधे मुले मुद्दाम मागचे सीट पकडायला पळायची यासाठी की बस उधळली तर पार बसच्या टपापर्यंत उडायचे.वर्गात आसावरी च्या आगमनापुर्वी रेखा ही एकमेव उंच व धिप्पाड मुलगी. कबड्डी खेळतांना “कबड्डी कबड्डी”म्हणत आली की एका खेपेत ५-६ मुलींना घेउनच जायची.
डॉ. केंजळे आणि फॅमिली, पवार (नाशिक),  मानकर,  देवरे (धुळे),  पालकर,  सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
श्री. म्हसकर हे मागच्या गेटटुगेदरला ही भेटले होते.येतांना मी त्यांच्या गाडीतच आले होते.मधे ही कित्येक वेळेस आमचे फोनवर बोलणे झाले.पण घाटगे फार्मला पहिल्या प्रथम त्यांनी मला ओळखलेच नाही.वर निलीमाला आडुन आडुन "ही नयना'ना गं?"असं विचारतांना आढळले.त्याबद्दल त्यांना पुढच्या गेटटुगेदरला झाडुन सगळ्या हजर लेडीजची नावं ओळखण्याची शिक्षा देण्यात आली आहे.
विरेश आजरी: विरेश आजरी तर म्हणाला, की सर त्यांना नू.म्.वि. (नुकतेच मवाली विद्यार्थी) असं म्हणायचे. शेवाळे सरांनी पोटाला काढलेले चिमटे, टोचलेले खडु हे ही त्याला आठवले. आणि शिवथरे सर एका हाताने कधीच कानफटात मारायचे नाहीत. दोन्ही हातांनी कानावर फाटदिशी वाजवायचे.
मंटी: मंटीबाई तर विद्यापीठात रोडवरुन चालल्याच नाहीत हे त्यांना आता आठवलं. नेहमी भिंतींवरुन उड्या मारत चालायचं.मला ती पुढच्या जन्मी काय होणार आहे याची फार्र फार्र उत्सुकता आहे.मंटीच्या बोलण्यात इतक्या वर्षांनंतर भेटल्याने खुपच एक्साईटमेंट दिसत होती.मंटीने एकदा रावसाहेब माळीला बदडुन काढले होते आणि खुप लागल्यामुळे तो वडीलांना घेउन शाळेत आला होता...हे मंटीला आठवले.एकदा तर दुसरीत असतांना या बाईने लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला भाषणाला उभी राहिल्यावर "आज आपल्या सर्वांची पुण्यतिथी आहे' असं बोलुन बॉम्ब टाकला होता.
सुरेखाला तर आठवले की तिची नी संजु मोरेची इतकी जबरदस्त टक्कर झाली होती की त्याचा व्रण अजुनही तिच्या कपाळावर आहे.माधव तिच्या वेण्या ओढायचा.
सुनंदा.ही बाई मोठी धीराची.तिच्या आठवणी अतिशय हृद्य होत्या.तिची आई चार घरची भांडी धुण्याची कामं करायची. वडील शिपाई. आम्हाला आठवलं आम्ही वर्गातल्या सगळ्या मुली तिच्या घरी डिग्रजला गेलो होतो. एका झोपडीत रहायची ती.आज ती स्वतःच्या पायावर उभी आहेच्..लवकर लग्न झालं तरी नंतर तिने शिक्षण पुर्ण केलं! डी.एड, बी.एड केलं, जि.प.च्या शाळेत मास्तरीण म्हणुन लागलीये. पण आपल्या दोघी मुलांनाही तिने डॉक्टर बनवले. सर्वांनाच फार कौतुक वाटलं तिचं! हॅट्स ऑफ टु सुनंदा!!!
नंतर स्वतः एकबोटे काका समोर बोलायला उभे राहिलेत्यांनी तर प्रत्येकाला,काहींच्या तर वडीलांचे पुर्ण नावही सांगितले. ही ८४ ची बॅच इतक्या वर्षानंतर भेटलीये तर आम्ही पुढेही समाजोपयोगी काय काय करु शकतो याबद्द्ल त्यांनी मार्गदर्शन केले.ते करतांना ते उदाहरणादाखल म्हणाले की त्यांचा स्वतःचा असा ६० रिटायर्ड लोकांचा ग्रुप आहे. ते ही कायम भेटत असतात.समाजकार्यात बरोबरीने सगळे मदत करतात.जमा झालेल्या निधीचा योग्य विनियोग करतात.
तेवढ्यात मधली सुट्टी झाल्याची घंटा झाली.दिवंगत वर्ग मित्र/मैत्रीणींना श्रद्धांजली अर्पण करुन आम्ही जेवणाच्या हॉलकडे कूच केले. बाजरीची भाकरी, ठेचा, पिठलं, दोन भाज्या, वरण भात, मसालेभात, जिलबी, ताक असा फर्मास बेत होता. तिथे मग सर्वांनीच आडवा हात मारला. जेवतांना खुप धम्माल आली. एकीकडे आठवणी निघत होत्या. सुरेखाच्या घराच्या कंपाउंडमागे 'गुंजेचं झाड' होतं हे मला आठवलं! सुरेखाचे सुंदर अक्षर कुणाला आठवले तर कुणी वर्षा देसाईची आठवण काढली. मला तर आठवीत असतांना 'हैद्राबाद' इथे ट्रीप गेली होती तेव्हा कुठल्या तरी 'पुर्णा' स्टेशनवर कुणीतरी निलिमा चौधरी बसलेल्या काचेच्या खिडकीला दगड मारला नि निलुच्या डोळ्यात काचा घुसल्या होत्या हे आठवले. तसेच कुणी टारगट मुलाने वरच्या फळ्याच्या बर्थवर झोपलेल्या एका मुलीची वेणी व त्याचबरोबर तिच्या ड्रेसचा कंबरेचा बेल्ट याची गाठ बांधली नि ती मुलगी कशी बोंबलत उठली हे ही आठवले.जेवतांना निलुने इकडे तिकडे बघुन हळुच सांगितले कि तिला शाळेत असतांना राहुल फार शिष्ट वाटायचा.एकीकडे जेवणाच्या चवीने तर एकीकडे गप्पांनी पोट भरत होते.हशा आणि टाळ्यांचा कल्लोळ इतका होता की आमच्या व्यतिरिक्त आलेले इतर लोक ही आमच्याकडे बघत होते. घाडगे रिजॉर्ट प्रशासनाने डोक्याला हात मारुन घेतला होता. आणि राहुलला एकीकडे बोलावुन," तुमच्या फॅमिलीला घेउन आलात तरच एंट्री देऊ, पुन्हा एसपीएमव्ही गेट टुगेदर इथे करु नका" अशी तंबीही दिल्याचं ऐकिवात आहे.
जेवण झाल्यावर ग्रुप फोटोची टुम निघाली.त्यासाठी लॉनकडे जात असतांना एक वयस्कर स्त्रीपुरुषांचा ग्रुप दिसला. तेव्हा माधवला फार्र फार भरुन आलं नि तो सद्गदीत आवाजात म्हणाला,”कदाचीत काही म्हणजे १०-१५ वर्षांनी आपणही असच दिसु आणि असच इथे येउ!"
फोटोसेशन आटोपलं लगेच सगळ्यांची निघायची घाई सुरु झाली.तरी राहुलने 'चहा येइल इतक्यात'असं सांगुन तासभर थोपवुन ठेवलं. पुन्हा गोलाकार बसलो. आसावरीने टुम काढली सर्वांनी उखाणे घ्यावेत. सर्वात शेवटी तिनेही एक जबरदस्त लांबलचक उखाणा घेतला.
चहा झाला.. सर्वांनाच पुढे जायची घाई होती. पण कुणाचाही पाय निघत नव्हता. रेंगाळणार्‍या जड पावले गाड्यांमधे परतत होती. गाड्या सुटल्या....खिडकीतुन निरोपाचे हात हलले...!
 खरय! म्हणतात ते!
जिव्हाळ्याचे असे चार क्षण
कधीतरीच वाट्याला येतात.
थांबायचे असे वाटत असतांनाच
हातातुन रेतीच्या कणांसारखे
निसटुन जातात…
ओंजळीतुन जपुन ठेवुया,
त्या कणांना…
 मनाच्या एका कप्प्यात...
सावित्रीबाईने दिलेली शिदोरी म्हणुन
आयुष्यभरासाठी!

माझ्या या सगळ्या वर्ग मित्रमैत्रीणींचा भरपेट उत्साह आणि साथ यांनी हे गेट टुगेदर यशस्वी झालं!खुप नॉस्टॅलजीक वाटलं!एकेक जण आठवणी सांगत असतांना आम्हीही त्याच्याबरोबरच वर्गात फिरुन येत होतो.शाळेचे ते निरागस दिवस सगळेच 'मिस'करत होते. खरं तर प्राथमिक शाळेची तरी पक्की इमारत होती. पण माध्यमिक ला तर पत्र्याचे छत आणि भिंती असलेल्या वर्कशॉप्समधेच पार्टीशन टाकुन वर्ग बनवले गेले होते.पावसाळ्यात पत्र्यावर टपटप थेंब वाजु लागले की सर शिकवणे थांबुन पाढे म्हणायला लावत. पण म्हणतात ना, शाळा म्हणजे चार भिंतींची निर्जीव इमारत नाही. तर त्यातील विद्यार्थी, शिक्षकवृंद यांनी शाळा बनते.
मजिद म्हणाला तसं,सावित्रीबाईने जे संस्कार आपल्यावर रुजवलेत ते इतके खोलवर आहेत की प्रयत्न करुनही कुणी वाईट मार्ग अवलंबणार नाही याची मला खात्री आहे. शेवाळे सर, शिवथरे सर यांच्या छड्या/ काठ्या खाऊन आम्ही इतके कणखर झालेलो आहोत की आयुष्यातल्या कुठल्याही संकटाला समर्थपणे परतवण्याची आमच्यात जिद्द आहे.
प्राथमिक शाळेत शेवटच्या तासाला सर्वांनी मिळुन एका सुरात म्हटलेले 'बे एके बे'चे पाढे,दोन बेंचच्या लाईनींमधे येउन 'माझ्या मामाची रंगित गाडी हो, तिला खिल्लार्‍या बैलांचे जोडी हो" असे नाचत नाचत म्हणणे..ते रुसवे-फुगवे, "माझी मूठ उघड' असं डोळ्यात पाणी आणुन म्हणणे, शाईच्या एकेका थेंबाची केलेली वाटावाटी, आणि शाई नाही दिली तर," ए,मी कसं तुला १५ दिवसांपुर्वी ४ थेंब शाई दिली होती"असं म्हणत मागितलेली परतफेड, स्त्यात लागणारं ते 'भैरोबा'चं दगडी मंदीर, सूर्यफुलांच्या बिया वेचणे, शाळेच्या रस्त्यावर असलेली 'तुती'ची झाडे, बेकरीच्या बाहेर सापडलेले अभ्रक आणि त्यासाठी भांडाभांडी,वर्कशॉपच्या उतारावर वर्तुळाकार बसुन डबा खाणे, दसरा दिवाळी आली की आपापल्या वर्गांची साफसफाई,कुठल्याही स्पर्धेची नोटीस आली नि मॅडमने विचारले की भाग घेण्यासाठी वर झालेली बोटे... सगळं सगळं आठवलं.  
खरच, ते फुलपाखरी दिवस परत येतील?  

Thursday, 13 October 2011

पुनरागमनाय च!

का रे, रेंगाळलास ना पुन्हा?
की तुझा पायच निघत नाहिये
इथून?
'पण' तर नाही ना केलास...
रोज भिजवायचच असं!

उणापुरा ४ महिन्यांचा आपला सहवास!
तसा मनासारखा
तू कोसळलाच नव्हतास
यापूर्वी..
दाटून आलेलं मळभ आणि
दिवसभर फक्त कंटाळवाणी रिपरिप..!

कालचं तुझं रुप मात्र..
प्रचंड आवडलं!
बेभान होऊन कोसळलास!
तरु, वेली, घरे, माणसे..
पान नं पान हलवून सोडलस!
अगदी सोसाटत, रोरावत आलास..
सोबत आभाळातली आतिशबाजी!

परतीचा प्रवास लांबलाय खरं!
पण हवाहवासाच!
तसं तुझं जाणं
हुरहुर लावून जातं रे
आता फक्त एक वचन दे!!
असाच येत जा दर वर्षी
बेंधुद...बेभान..सोसाटत!


पुनरागमनाय च!!

Friday, 30 September 2011

...कुणा न कळता पावसात रडतो मी

सुधरण्या चुका जन्म नव मागतो मी
जगावेगळे मागणे मागतो मी

हा पण असाच एक तोडका मोडका प्रयत्न!

कसे हे असे सोयरे,ना सुतक त्यां
तयांचे हि श्राद्ध अता घालतो मी

भिजवुनी मला रोज जातो तसा तो
कुणा न कळता पावसात रडतो मी

कसे सांगु कोणा फुले नच नशीबा
इथे अन तिथे कंटकी भासतो मी

नको रे अता येरझार्‍या पुन्हा त्या
उरकली कि कामे तुला सादतो मी

Tuesday, 9 August 2011

ही जगाची रीत नाही!

एक छोटासा प्रयत्न गझल लेखनाचा! :)

आबरु टांगीत नाही
ही जगाची रीत नाही

प्रीतही व्यवहार झाला
मीच हे घोकीत नाही

लपविला हृदयी वसंता
अन ऋतू फिरकीत नाही

काय त्यांची रीत उलटी
आठवावी प्रीत नाही ?

जाळले हातावरी मन
करपणे सोशीत नाही

कोंडुनी सूर्यास म्हणती
तेज हे विक्रीत नाही

झाकते वळ, पाठ दुखरी
काय हे विपरीत नाही ?

आज का ''नयनां''त पाणी
कढ कधी थिजवीत नाही

Monday, 6 June 2011

अलिकडे...पलिकडे!

किती ...
संथसं पाणी
अलिकडे!
लाट नाही
नाही उमंग
वृक्षांचे स्तब्ध
प्रतिबिंब!
फुल टपकते
पाण्यात
दुरवर गेले
तरंग
मोहरते
पाण्याचे अंग!
***
किती ...
गतिमानसे
जीवन पलिकडे!
उंचावरुन
कोसळणारा प्रपात
घोंघावता वारा
धसमुसळे पाणी
नि खडकांमधली
फेसाळती रेघ
भिजते फुल
तुटल्या पाकळ्या
खळाळते
पाण्याचे अंग!

Friday, 3 June 2011

स्वप्नांचे अक्षांश, रेखांश...!

आजकाल मी तपासत असते
आपल्या दोघांच्या स्वप्नांचे
अक्षांश, रेखांश...!

मान्य आहे मला-
की माझ्या झोपडीच्या
स्वप्नांमधे 'अर्थ' नसेल

पण तुझ्या महालाच्या
स्वप्नांत उणीपुरीसुद्धा
'माया' नव्हती !

हे तुला कळलं तरी पुष्कळ आहे!

Thursday, 26 May 2011

चाहुल!

पलटल्यात आता सावल्या
तिन्हीसांजेला गार वारं
सुटु लागलय...
त्याच्या येण्याची चाहुल देणारं!
आभाळभर विखुरलेले
ढग दिसु लागलेत आताशा!
कोसळणार आहे म्हणे...
दगडावरही बीज रुजेल
असा पाऊस!
कित्येक शतकानंतर!

गुलमोहर तर
बहरलाय ना अंगोपांगी!
भुईमुगही तरारुन उठलाय
गावाकडच्या केळी पण
रसरसल्यात म्हणे!
आणि पपयांच्या भारानं
वाकलीत ना झाडं!

पंख्याआड चिमण्यांची
लगबग सुरु झाली बरं...
एकेक काडी जमवत!
ओढ्याकाठच्या पिंपळाची
सळसळ वाढलीये केवढी तरी!

तेव्हा येशील!
मग मात्र म्हणु नकोस...
मी काही सांगितलं नव्हतं
वेळीच!

Friday, 29 April 2011

"३६० डिग्री"

या काही च्या काही कवितेची प्रेरणा: :)
http://www.maayboli.com/node/22903, http://www.maayboli.com/node/22901

माझ्या परीघाभोवतीचं
तुझं कपोलकल्पित वर्तुळ
तुझ्या तद्दन
भ्रामक कल्पनांचं!

प्रमेयांच्या गर्तेत राहुन
समांतरपणा साधयचाच
होता तर का
फिरत राहिलास
३६० डिग्री?

निदान...एखादी स्पर्शरेषा
तरी आखायची होतीस?
दोघांना स्पर्शणारी....!

हे विजयी, पराभूत मी (की तु?)

Wednesday, 27 April 2011

नैनं छिन्दन्ति.....!

बिटकोSSSS ह्या पिशव्या घेउन जा बरं! अशी बाबांची हाक आली की माझ्या कपाळात आठी चढायची.
ए मम्मी, बघ ना गं...किती लांबुन रोडवर उभं राहुन हाक मारतात ते! असं आईला म्हणत मी त्या हाकेला 'ओ' देण्याचं टाळायचे हे नेहमीचच!  उलट, हॉलमधे कोणी असेल तर जाउन बाबांच्या हातातल्या पिशव्या घ्या असं फर्मावयाचे. बाबांचा खुप राग यायचा, त्यांनी अशी हाक मारली की! मी काय आता लहान सहान आहे का लगेच पळत जायला. का म्हणुन मीच पळायचं? हॉलमधे भाऊ असतात ना बसलेले? वै वै .... त्यात ही अक्षय्य तृतीया म्हणजे मला लहानपणापासुन आवडत नव्हती...ही एक तर येते भर उन्हाळ्यात,वैशाखात! बाबा पितरांचे श्राद्ध वै. खुप मनःपुर्वक करायचे. पण देवाचं काही कुळधर्म/कुलाचर म्हटलं की त्यांची चिडचिड ठरलेली. बरं या वैशाख तृतीयेला आधीच उन्हाने हैराण लवकर उठुन पाण्याची मातीची घागर भरायची, पुरणावरणाचा स्वैंपाक करायचा, ते आधी पितरांचा घास टाकुन आम्हा घरातल्या बायकांना जेवायला उशीर व्हायचा. त्यामुळे अक्षय्य तृतीया हा सण मला अजिबात आवडत नव्हता.
बाबांचं वय ७२. पण अजुनही घराचे सर्व व्यवहार आपल्याच हातात ठेवायचा अट्टाहास. अर्थात आम्हीही कधी प्रयत्न केले नाहीत म्हणा...त्यांच्या हातातुन ते काढुन घ्यायचे. कारण ते जेवढी बाहेरची कामे करतील तेवढं बरच होतं आम्हाला. थोरल्याचं तर लग्न झालेलं.
बाबा एकीकडे म्हणायचे की अरे ह्या कामाचं हातात घ्या, पण एकीकडे हे सगळं मुलांच्या उधळमाप स्वभावामुळे असेल कदाचित ते आमच्या हातात द्यायला कचरायचे. लाईट/ फोनची बीलं, वर्षातुन एकदा घरपट्टी, पाणीपट्टी भरणे, आठवड्यातुन दोनदा दळण आणणे, रोजचा भाजीपाला, किराणा, दुध वै. सगळं बाबांनी आपल्या हातात ठेवलेलं! आधीच बाबांचा स्वभाव प्रचंड काटकसरी. जुन्या सांगवीत तोच तांदुळ १ रुपयाने कमी आहे म्हणुन हे ती मधे मधे त्रास देणारी सेकन्डहॅन्ड स्कूटर दामटत तिकडे जाणार, भाजीविक्रेत्यांशी घासाघीस करुन भाज्या आणणार....आम्हाला हे पटत नव्हतं पण बाबांचा सगळीकडे एक खांबी तंबु होता. लग्न असो की दशक्रिया विधी सगळीकडे बाबाच अटेंड करायला जायचे..भावंडं मोठी पण त्यांनाही लोकांमधे मिसळायला इतकं आवडत नव्ह्तं.
बाबांचा स्वभाव गेल्या सहा महिन्यापासुन जास्त चिडचिडा झाला होता... नव्हे त्यांना याची जाणिव करुन दिली जात होती त्यामुळे ते आणखी चिडत असत. डायबेटीस, हार्ट ट्रबल,अ‍ॅसिडीटी या सगळ्या आजारांनी कायमचं घर केलच होतं बाबांच्या शरीरात.
सर्व भावंडात मी त्यांची आवडती....आवडती असली तरी माझ्याशीच त्यांचे जास्त वादविवाद होत असत, आणि लहानपणी त्यांच्या हातचा सर्वात जास्त मार ही मीच खाल्ला. पण आता या वयात त्यांना विचार सल्ल्याला कुणीतरी हवं असायचं. बाबा आणि आई यांच्या वयात १२ वर्षाचं अंतर होतं त्यामुळे बाबा त्यांच्या लग्नापासुनच आईचं काही ऐकुन घेत नसत.... हो पण मी मुलगी असुन माझ्याशी सल्ला-मसलत करायचे. माझं नि त्यांचं नातं वडील-मुलगी या ही पलिकडच होतं... एकवेळ त्यांना काय म्हणायचय हे आईला कळत नव्हतं पण मला बरोबर कळायचं. कधी कधी तर आईच्या एखादी वाक्यावर बाबा काय म्हणणार हे मला माहित असायचं मग बाबा म्हणायचे,"बघ, मी अगदी हेच बोलणार होतो किंवा माझ्या डोक्यात अगदी हेच विचार आले होते.
जाने. २००९ : मोठ्या काकु वारल्यामुळे आता मोठ्या काकांचं कसं होणार या विचारात बाबा असायचे. काकु जायच्या आधी ८ दिवस आधीच काका घरावरच्या पत्र्यावरुन पडल्याने बेडवरच होते. साधारण १३-१४ तारखेला कॉलनीतल्या एका डॉक्टरच्या आईचं निधन झालं. प्रेतयात्रेला बाबा जाऊन आले. आल्यानंतर त्यांना काय वाटले कुणास ठाऊक...अचानक म्हणाले,"अरे तिरडी बांधायचं शिकुन घ्या रे पोरांनो! त्या ठिकाणी तिरडी कोणालाच बांधता येत नव्हती तर किती फजिती झाली लोकांची!"
मी तर बाबांवर उखडलेच,"बाबा, तिरडी बांधायला काय शिकायची गोष्ट आहे? जग कुठे चाल्लय आणि तुम्ही मुलांना काय शिकायचं म्हणताय?" हा विषय तिथेच संपला.
३० जाने : गुजरातमधील नारेश्वरी तीर्थाटनासाठी गेलो. आमच्या बरोबर असलेल्या गुरुंबरोबर बाबांना नर्मदास्नान घडले म्हणुन आम्हाल हेवा वाटला होता बाबांचा. पण नियतीच्या मनात दुसरेच काही होते.
५मार्चःऑफीसातुन घरी आले तर बाबांना त्यांचा नेहमीच्या डॉक्टरकडे (सांगवीतच) अ‍ॅडमिट केल्याचं कळलं. म्हणुन धावतच त्यांना बघायला गेले. सकाळी टॉयलेटच्या मागे घराबाहेर असलेल्या फरशीवर बाबांनी पाण्यासाठी टाकलेला सिमेंटचा पाईप पाणी जात नाही म्हणुन फोडायला घेतला तर छातीत दुखायला लागले. मग आईला घेतलं नि पायी जाउन स्वत:हुन अ‍ॅडमीट झाले होते... ! संध्याकाळी मी गेल्यावर बाबा बाथरुमला जाऊन आले....तेवढ्यात धाकटा भाऊही ऑफीसमधुन आला. त्यावेळेस बाबांना प्रचंड थंडी वाजुन हुडहुडी भरली ...एवढी की अक्षरशः त्यांच्या अंगावर ४-५ चादरी/ब्लँकेट टाकुन वरुन धाकट्याने त्यांना धरुन ठेवलं तरी बाबा थरथरत होते. नंतर सडकुन तापही भरला.आम्ही लगेच डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी ब्लड युरीन सॅंपल घेउन लॅबमधे पाठवले. छातीत दुखणं हा मुख्य प्रॉब्लेम असल्याने या तापाकडे तसं सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. तेव्हा कोणाला ठाऊक होतं, हा ताप नंतर इतकं उग्र रुप धारण करणार आहे आणि त्याच्या रुपात मृत्युनेच त्यांच्या शरीरात प्रवेश केला आहे.
६मार्चला बाबांनी स्वतःच डिस्चार्ज घ्यायला लावला. घरी आल्यावर मी त्यांचा बेड माझ्या बेडरुममधे टाकला... आणी बजावुन सांगितले की रात्री पहाटे उठाल तेव्हा मला आधी उठवत जा म्हणुन.
७मार्च, पहाटे ३.३०वा:बाबा स्वतःच उठुन बाथरुमला गेले होते...मला आवाज आला म्हणुन मी उठुन त्यांना टॉयलेटजवळुन हाताला धरुन आणले व बेडवर बसवले. मला का उठवले नाही? असे विचारले तर काहीतरी असंबद्ध भाषेत बरळायला लागले... का माहित नाही, मला तेव्हा बाबा एखाद्या लहान मुलासारखे भासले म्हणुन मी त्यांना बरं बरं म्हणुन समजल्यासारखं केलं आणि झोपवलं! त्यावेळेस माझी कल्पना अशी की डायबेटीस असल्याने व शुगर वाढल्याने तोंड कोरडं पडतं...त्यात बाबा रात्री घोरायचे त्यामुळे घसा कोरडा पडुन असा आवाज येत असावा. म्हणुन मी चटकन दुध गरम करुन त्यांना दुध-हळद दिली.
काहीशी शंका आली म्हणुन आईला उठवुन त्यांच्याजवळ बसवलं आणि धाकटा(नाईट शिफ्टला गेला होता) त्याला फोन करायला म्हणुन हॉलमधे गेले. लहान भावाला फोन करुन सांगितले, तो म्हणाला मी येतोच आहे ५ वाजेपर्यंत. बाबांना दुध घेतल्यावर छान झोप लागली. लहान भाऊ ५ वा. आला त्याला परिस्थिती दाखवली..तेव्हा ही त्याच्याशी बाबा तसेच बोलत होते. त्याने जेव्हा बाबांना जवळ घेतलं आणि आम्हाला बाबांचे पडलेले कान दाखवले आणि म्हणाला तुम्हाला कळत नाही का? हे सिरियस आहेत. लगेच त्याने मित्राला फोन करुन अँब्युलन्स मागवली. हा त्याचा मित्र औंधच्या एका सो कॉल्ड प्रतिष्ठित हॉस्पिटल मधे कामाला होता आणि अ‍ॅंब्युलन्स ही भाड्याने द्यायचा. सकाळी ६-६.३० पर्यंत हॉस्पीटलमधे पोचलो.
हॉस्पीटलमधे एवढ्या सकाळी ज्यु.डॉक्टर्स होते. सिनियर्स येइपर्यंत त्यांनी काही चाचण्या घेतल्या... आणि तात्पुरती जनरलमधे व्यवस्था करुन दिली. १०.३० वाजता सिनियर डॉक्टरांनी तपासणी करुन आम्हाला सांगितले की  पॅरॅलिसिसचा माईल्ड अ‍ॅटॅक आहे तरी आपण त्यांना आयसीयुमधे ठेउया. पोटात धस्स झाले... आम्ही कुठल्याही  ट्रीटमेंट्साठी तयार होतो.
बाबांचं असंबद्ध बोलणं सुरुच होतं आयसीयु मधे मी काही काही निमित्ताने सतरा चकरा मारत होते. नाका तोंडात घातलेल्या नळ्या, ऑक्सीजन मास्क...बाबांना कधी या अवस्थेत पाहिलं होतं!  त्यांना जेवण भरवायच्या उद्देशाने गेले..बघते तो काय! बाबांनी हाताच्या सलाईनच्या नळ्या काढुन टाकलेल्या.. .. रक्तप्रवाह उलटा चाललाय...बेडशीटवर रक्त सांडतय आणि बाबा जवळच्या बेसिनकडे हात धुण्यासाठी हात पुढे करत होते. कसंबसं त्यांना धरुन पुन्हा बेडवर बसवलं. आणी गप्पा मारत त्यांना बोलतं ठेवल.त्यांचे शब्द काही कळत नव्हते तरी त्यांच्याशी उगाचच इकडचं तिकडच्या गप्पा मारल्या! उगाचच नको तिथे त्यांचा सल्ला विचारत होते त्यामुळे त्यांचा असंबद्ध पणा कमी होत गेला.. वाक्यातला एकेक शब्द ते पुर्ण म्हणायला लागले.
 दत्तबावन्नीवर माझा विश्वास होता. मधुन मधुन त्यांच्या नाडीवर दत्तबावनी म्हणत होते. संध्याकाळपर्यंत तर बाबा अगदी वाक्य ची वाक्य नॉर्मल बोलु लागले.... पण तरी त्यांचं सलाईनच्या नळ्या काढुन टाकणे चालुच होते. बेडशीट बदलुन वॉर्ड बॉय कंटाळले...मग त्यांना लपवुन हे करणं सुरु होतं. एकदा तर नळ्या काढुन टॉयलेटला गेले...तिथेही रक्त सांडलेलं! दोन दिवस तिथे राहुन पुन्हा बाबांच्या आग्रहानेच १० मार्चला डिस्चार्ज घेतला. तो तेव्हा आलेला ताप काही उतरत नव्हता.
आता बाबांना घरी आणल्यावर आम्ही त्यांना गंमतीनं म्हणायचो ही की 'बाबा ते तुमचं एवढ रक्त गेलं ना त्यात ह्या हृदयातल्या रक्तप्रवाहात अडचण करणा-या गुठळ्याही सांडल्या असणार.'
घरी आणल्यावर आम्ही आमच्या बुद्धीप्रमाणे रक्तातल्या गुठळ्या कमी करण्यासाठी जेवणात भरपुर लसुण वै.सुरु केले. संध्याकाळी रोज मी तळपायाला मालीश करुन देत असे. रोज संध्याकाळची देवापुढे बसुन त्यांच्य नाडीवर दत्तबावनी, रामरक्षा तसेच रक्षा लावणे सुरुच होते. विशेष म्हणजे देवापुढे नमस्काराला का कु करणारे बाबा यावेळेस मात्र निमुटपणे माझं ऐकुन बसत असत. तापाला उतार नव्हताच.. पुन्हा नेहमीच्या डॉक्टरकडे, त्यांच्या वेगळ्या टेस्टस! टेस्ट्स मधुन काही निष्पन्न नाही. मधे एकदा माझ्या डोक्यात असच काहीसं आलं कधीपासुन बाहेर बागेत एक मडकं (मागच्या अक्षयतृतीयेला पुजन केलेलं)पडलेलं ते कोणी फेकत ही नव्हते...त्याचा वरचा भाग तोडुन त्यात माती भरुन काही रोप वै.लावुया... म्हणुन स्क्रु ड्रायव्हर घेउन पद्धतशीरपणे फोडायला गेले तर आख्ख्या मडक्यालाच तडे गेले आणि ते फुटले..!

 मधे एकदा बाबा अंगणात बसले होते बागेतल्या सोनचाफा आणि अनंत माझ्या सांगण्यावरुन त्यांनी लावलेले पण ३-४ वर्ष झाले दोघाही झाडांना फुलेच येत नव्हती. त्या दिवशी बाबा चिडुन म्हणाले,"जाऊ दे गं ही दोन्ही झाडे काढुनच टाकुया... मी म्हटले," बाबा नको ना, या वर्षी वाट बघु!" .
या सगळ्या प्रकारातुन २७ मार्च हा दिवस उजाडला.
आतेभावाच्या सुनेचं डोहाळेजेवण म्हणुन मी नि आई आकुर्डीला गेलो...तिथेही मन लागत नव्हते.लवकर घरी परत आलो. आल्या आल्या बघितले तर बाबा बाथरुमकडे निघाले होते ...अगदी सावकाश पावले टाकत पण तिथेच त्यांना लघवी झाली. मनात शंकेची पाल चुकचुकली .. हा प्रोस्टेटचा आजार तर नव्हे? उतारवयात पुरुषांना हा त्रास होतो...युरीनवर कंट्रोल रहात नाही वै.वै माहीत होते. तापाचा चढ उतार चालुच होता. बाबा आता मला अ‍ॅडमिट करा रे असं म्हणु लागले होते.आमचीही तयारी होती.  १ तारखेला गावाकडुन चुलत भाऊ बाबांना बघायला आला. त्याला बरोबर घेउन पुण्यातले प्रसिद्ध युरॉलॉजिस्टकडे दाखवायला गेलो. पण त्यांनीही रिपोर्ट दिला आणि तसे काही नसल्याचे/ अ‍ॅडमिट करायची गरज नसल्याचे सांगितले. बाबा आता गप्प गप्प असायचे

... मधेच नाशिकची बहिण येउन गेली! एक दिवस संध्याकाळी आल्यावर मला म्हणाले,"बिटु, मला नाही वाटत आता मी फार काळ जगेल"! मी हादरलेच पण वरवर सारवासारव म्हणुन उलट बाबांवरच चिडल्यासारखं दाखवलं"बाबा, गेले २० वर्ष तुम्ही डायबेटीस सारखा आजार पोसताय ना तुमच्या शरीरात, मग या छोट्या आजाराला इतकं का घाबरताय?"
२ एप्रिलःबाबांनी मला त्यांच्याकडे बोलावुन जवळ बसवले.. त्यांच्या बॅगातले एकेक कागद, डायरी दाखवत मला त्यांचे एल आय सी पॉलिसी, फंडातले पेपर्स वै. सगळी माहिती दिली. आणि वर सर्वांना म्हणाले...."आताच काय लागतील माझ्या सह्या तर घ्या रे पोरांनो... बघा मला आताच सही करता येत नाहीये, हात थरथरतोय, तुम्हाला पुढे पैसे लागतील! असं म्हणत दोन-३ को-या चेक्सवर सह्या केल्या. मी अवाक...पण त्यांचे मन सांभाळण्यासाठी काहीबाही उत्तरे दिली.
५ एप्रिलः तापाला उतार नव्हताच... बाबांच्या नेहमीच्या डॉक्टरकडे घेउन गेलो. त्यांनी नेहमीप्रमाणे डायबेटीसच्या , तापाच्या सगळ्या टेस्टस केल्या. काही मेडीसीन दिले. आता आमच्याकडे ३-४ डॉक्टरचे मेडीसीनस झाले होते...एवढ लक्षात ठेवणं म्हणजे मुश्किलीचं काम होत. कारण बाबांच्या डायबेटीस, अ‍ॅसिडीटीच्याही गोळ्या होत्या त्यात पॅरॅलिसिस आणी या तापाच्या गोळ्या औषधांची भर पडलेली. त्यात दिवसभर घरी असणारी आईच...तिला इंग्रजी वाचता येत नव्हतं...म्हणुन मी एका कागदावर लिस्टच बनवुन दिली. सकाळी नाष्ट्याच्या आधी ह्या.. नाष्ट्यानंतर ह्या वै वै. बाबांचं जेवणही हळु हळु कमी होत गेलं होतं.
१२ एप्रिल, रविवारः आज सर्वजण घरी होते. आज वहिनी डिलीवरीसाठी माहेरी बडोद्याला जाणार होती. त्यासाठी तिचा भाऊ आला होता. बाबांना आंघोळ वर्ज्य असल्याने रोजचं स्पंजिंगच चालु होत.. त्यात उन्हाळा लागलेला म्हणुन सर्वानुमते बाबांना आंघोळ घालण्याचं ठरलं. पण बाबांचा नकार होता "बघा बरं , मला काही झालं तर तुम्ही जबाबदार"! मी म्हणाले"बाबा, चालेल! मी जबाबदार पण तुम्ही आंघोळ करा आज"! आईला दमा असल्याने मीच बाबांना बाथरुममधे खुर्चीवर बसवुन बाबांना आंघोळ घातली! नंतर त्यांना स्वच्छ कपडे घालुन आमच्या बागेत बसवलं जिथे बाबांनीच वेगवेगळी झाडं जोपासली होती. त्यांच्या आवडत्या पेरुच्या झाडाखाली बसवलं! उगाचच मनात विचार,' बाबा, मन भरुन बघुन घ्या तुमची झाडं.. तुम्ही हे खस्ता खाऊन बांधलेलं घर, तुमचं वैभव! " मनात वाईटच विचार का येतात कुणास ठाऊक! बाबा खाली मान घालुनच बसलेले... घर, झाडं काहीच त्यांनी बघितलं नाही!
१३ एप्रिलः आज बाबांना आमच्या फॅमिली डॉक्.कडे न्यायचेच्...या उद्देशाने संध्याकाळी घरी आल्यावर सगळे जण बाबांना घेउन जुन्या सांगवीतल्या आमच्या जुन्या फॅमिली डॉक्.कडे गेलो. त्यांनी पटापट ज्या ब्लड युरीन टेस्ट सांगितल्या त्या केल्या. दुस-या दिवशी रिपोर्ट आला आणि ते डॉक. आमच्यावर उखडलेच," इतके दिवस काय करत होता तुम्ही लोक? उद्याच्या उद्या यांना औंधच्या त्या प्रसिद्ध हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट करा"! तेव्हा कुठे आम्हाला बाबांच्या सिरियसनेसची कल्पना आली. तेव्हा कळलं की आपण एम एस्सीला स्टडी केलेला हाच तो बॅक्टेरीया इ.कोलाय. बाबांच्या युरीनरी ट्रॅक्टला याचेच इन्फेक्शन झाले होते... आणि ते इतके वाढले होते की १ ml सँपल मधे १.५ लाख जीवाणु होते.
१५ एप्रिलः लगोलग या दिवशी डॉक.ची अपॉईंटमेंट घेउन सकाळी दहालाच बाबांना अ‍ॅडमिट केले. घरुन निघतांना बाबांना थोडंफार खाउनच पाठवलं होत. बाबांबरोबर घरातुन बाहेर पाय काढतांना देवाची रक्षा लावली,"बाबा, उभ्याने जात आहात, आणि उभ्यानेच तुम्हाला परत यायचय- आडवं नाही!!" देवाने माझी हाक ऐकली नाही. पुन्हा त्याच नळ्या, ऑक्सीजन मास्क, यावेळेस सलाईनच्या बरोबर अँटीबायोटीक्सची इंजेक्शन्स पण होती.
दुपारी जेवणासाठी आई -भावाला घरी पाठवले. १ वाजता हॉस्पिटलमधले जेवण आले. चवळीची भाजी व चपाती ...बाबांनी अर्धीच चपाती खाल्ली असेल! त्यांना लगेच त्रास व्हायला लागला...जोरजोरात श्वास घेउ लागले! म्हणुन मी सिस्टरला बोलवायला पळाले तर त्यांचा लंच टाईम होता! २-३ वेळेस स्वतः जाऊन बोलावुन आले तेव्हा एकदाच्या त्या आल्या...बाबांना तपासले लगेच नर्स! वॉर्डबॉय !!असे ओरडत धावाधाव करु लागल्या! आम्हाला बाहेर काढुन देण्यात आले होते..त्यामुळे आत काय चाललय काहीच कल्पना येत नव्हती! मी घाबरुन आई/भावाला फोन करुन घरुन बोलावुन घेतले. त्यावेळेस कसं बसं बाबांना बरं वाटलं!

नंतर रोजचा तापाचा चढ उतार नेहमीचच चालु होतं.. हॉस्पीटलमधे अँटीबायोटीक्सची इंजेक्शनांचा मारा सुरु होता... त्याच्या स्ट्राँग डोस ने हार्टला प्रेशर येत होते. त्यात शुगरचा चढ उतार सुरु होता. सगळं ट्रायल अँड एरर बेसीसवर! इकडे आमच्याही सुट्ट्या...मधुनच ऑफीसला जाणे सुरु होते. नाशिकहुन बहिण आलेली होती. ती हॉस्पीटलमधे असल्याने आम्ही ऑफीसकडेही लक्ष देऊ शकत होतो.
एकदा बाबांच्या रुममधला रात्रीच अ‍ॅडमीट केलेला पेशंट दुस-या दिवशी वारला म्हणुन ती रुम साफ करण्याकरता बाबांना तात्पुरते दुस-या रुममधे हलवले! संध्याकाळी ऑफीसमधुन डायरेक्ट बाबांना भेटायला गेले तर बाबा भिंतीकडे तोंड करुन झोपलेले... त्यांच्याशी बोलावं म्हणुन त्यांना म्हटलं'" बाबा, उठा ना, बघा मी तुम्हाला भेटायला लोणी-काळभोरवरुन आले! " तर बाबा तिकडे तोंड करुनच म्हणाले," लोणी...लोणी... थोडसं लोणी लाव तुझ्या डायरेक्टरीण बाईला"! 
बहिण मला दुसरीकडे नेउन म्हणाली की हे असच बोलतायत! तिला तर म्हणालेले की "अरे पोरांनो, आताच माझी काय सेवा करायची करुन घ्या... नंतर पस्तावाल बरे! " बाबांचे हात पाय बारीक झाले होते. एकदा सहज हात बघितला तर पांढरा फटक हात, पिवळी पडलेली, चिरा पडलेली नखे! वाईट वाटायचे...बाबांच्या तर आता संवेदना ही कमी होत होत्या...बोलणं तर जवळजवळ नाहीच! धाकटा हॉस्पिटलमधे रात्री झोपायचा...सकाळी सकाळी चहा द्यायला जायचा तेव्हा छान बोलायचे...पण आमच्याशी नाही. सिस्टर टेस्टींग साठी दिवसातुन ४ दा रक्त न्यायच्या त्यावेळेस सुई टोचतांना सुद्धा बाबा निर्विकार असायचे.
मधुन मधुन बाबांच्या आयसीयुच्या वा-या सुरु होत्या. गावाकडुन सगळे नातेवाईक भेटायला येउन जात असत. बाबा, सर्वांना हात जोडुन नमस्कार करत आणि काही चुकलं असेल तर माफ करा असे हुंदके देत म्हणत. बाबांना अशा अवस्थेत आम्ही कधी पाहिलच नव्हतं... विचित्र वाटे! पण चमत्कारावर विश्वास होता... काहीतरी चमत्कार व्हावा आणी बाबा यातुन उठुन बसावेत असं वाटे.
२५ एप्रिल- शनिवार: बाबांचा ऑफीशियली वाढदिवस! दुपारी मी आणि पंत (मेव्हणे) जाऊन पिंप्रीतल्या आमच्या एका ज्योतिषाकडे जाउन आलो. त्याने प्रश्न विचारल्या विचारल्या सांगितले की तुमच्या बाबांची जायची वेळ झालेली आहे. तुम्ही त्यांना आता अडवु शकत नाही. शॉकच बसला हे ऐकुन! नंतर संपुर्ण रस्ता भर रडतच हॉस्पीटलमधे आलो. तर इकडे बहिण, भाऊ यांचे चेहरे प्रफुल्लीत होते. त्यांना विचारले तर म्हणाले की डॉक्टर म्हणतायत, आज बाबांना बरं वाटतय, उद्या सकाळी आपण त्यांना व्हिलचेअरवर बसवुन खाली रिसेप्शन कॉरीडोरमधे फिरवुया..काहीशा विचारतच बहिण्/भावाला हा ज्योतीषाकडचा प्रकार सांगितला तर त्यांनी वेड्यातच काढले! त्यादिवशी अमावस्या पण होती त्यामुळे भिती वाटत होती....दत्तबावनीचे पाठ सुरुच होते. ज्योतीषांचं काही खर नसतं अशी बहिणीची समजुन घालुन मेव्हणे तीला परत नाशिकला घेउन गेले.    
 आदल्या दिवशी ऑफीसमधे माझ्या हिंदी टायपिंग कामाचे ६००० रु. मिळाले होते! संध्याकाळी आधी बाबांच्या पायावर डोके ठेउन पैसे त्यांना दिले.. म्हटलं,'बाबा, हे तुमच्यासाठी! आपल्याला वैष्णवदेवीला जायचय ना तुम्ही बरे झाल्यावर!" बाबांनी फक्त मान डोलावली...आणि पाठीवरुन आशिर्वादाचा हात फिरवला...शेवटचा आशिर्वाद!!
२६ एप्रिल, रविवार : दुपारी हॉस्पिटलमधुन आल्यावर डोक्यात काहीतरी किडा वळवळला. घरात उंदीर झालेत नाहीतरी आपण सगळे घरी नसतोच, बाबांना घरी यायला अजुन १०-१५ दिवस तरी लागतील...माळ्यावरच्या बॅगा काढुन त्यात बाबांचे सगळे इस्त्रीचे कपडे भरुन पुन्हा वरती ठेउन दिल्या!! :(
रात्री ८.३० हॉस्पीटलमधुन फोन"बाबा, सिरियस! लवकर या! " लगोलग थोरल्या भावाला घेउन हॉस्पीटल गाठले. बाबांना आयसीयु मधे हलवत होते...डोळ्यात एकदम पाणीच आले. बाबांच्या जवळ जाउन हाक मारली. "बाबा' ! बाबा डोळे उघडायला तयार नाहीत. फक्त एक हुंकार!
उद्या २७ एप्रिल- अक्षय्य तृतिया, उद्याचं काय करायचं हे आईला विचारलं! आईचीही इच्छा दिसली नाही. रात्री बाबांसाठी परत भोपळ्याचं सुप करुन आणलं! १०.३० ते ११च्या सुमारास बाबांना सुप भरवलं आज २-३ वाट्या सुप माझ्या हातुन बाबांनी खाल्लं म्हणुन आश्चर्यमिश्रीत समाधान. का कुणास ठाऊक आज रात्री हॉस्पीटलमधे झोपावे हा विचार येत होता पण बाबांना विचारताच त्यांनी मानेनेच नाही म्हटले.आणि आईकडे बोट दाखवुन,'तिला थांबु दे' असा इशारा केला.
थोड्याशा नाराजीनेच मी व थोरला भाउ घरी परतलो. रात्री झोप येणे शक्यच नव्हते. खालच्या आख्ख्या घरात मी एकटी, वरच्या रुम्समधे मोठा भाऊ!
२७ एप्रिल,२००९ सोमवार, अक्षय्य तृतीया: सकाळी ऑफीसला जायला ६ वा. उठुन कणिक मळायला पीठ परातीत घेतले तोच मोठा भाऊ जिन्यावरुन पळत पळत खाली आला!"बिटु, चल आपल्याला हॉस्पीटलमधे जायचय, बाबा सिरियस झालेत!"
ते तसेच टाकुन हॉस्पीटल गाठले तर लहान भाऊ नि आई धाय मोकलुन आयसीयुच्या कॉरीडोरमधे रडतायत!"बिटु, आपले बाबा आपल्याला सोडुन गेले गं!!" खुप खुप रडले... आत जाऊन बाबांना बघण्याचे हिंमत होत नव्हती. थोडं सावरल्यावर लहान भाऊ म्हणाला.... डॉक. नी अर्ध्या तासाची मुदत दिली आहे...तोपर्यंत नातेवाईकांना बोलावुन घ्या म्हणालेत. म्हणजे बाबांचा अजुन श्वास चालुये? मी आयसीयुमधे धाव घेतली. ५.३० फुटाचा देह कॉटवर निपचीत पडलेला... नाकातल्या नळ्या काढलेल्या होता. कार्डीयोग्राम वै. यंत्र निर्विकार पणे एकच आडवी लाईन दाखवत होत्या. तोंडात फक्त चुन्याच्या निवळीचे पाणी ...त्यात येणा-या बुडबुड्यांवरुन श्वास चालुये असे वाटत होते. रडत रडत परत एकदा नाडीवर दत्त बावनी म्हटली! अस्पष्टशी लाल रेषा कार्डीयोग्रामवर चमकली ... एकदम उत्साह आला. बाबा शुद्धीवर येताहेत वाटतं पण आयसीयुतल्या लोकांनी सांगितलं काही उपयोग नाही. पहाटेच त्रास झाला बाबांना! डॉक. ला बोलावलेलं... पंपिंग केलं, फरक पडला नाही आणि आता ते शेवटचा श्वास घेतायत.खरं खोटं देवाला माहित.. बाबांजवळ तासभर बसुन होतो.
दुपारपर्यंत गावाकडुन सगळे नातेवाईक आले. संध्याकाळी ६ वाजता बाबांच्या आवडत्या पेरुच्या झाडाखाली आंघोळ घालण्यात आली आणि ७.३० ला बाबांना नेण्यात आले. अक्षय्य तृतीयेचं पितरांना जेउ घालण्याऐवजी बाबा स्वतःच त्यांच्यात जाउन सामिल झाले होते.
२८ एप्रिलः टेरेसवर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेले तर सोनचाफ्याच्या झाडाला २-३ फुले आलेली दिसली. लगेच तोडुन आणली.खाली अनंताकडे बघितले तर अनंतालाही एक टप्पोरे फुल आलेले. अगदी त्याच वेळेस बाबांच्या अस्थी आल्या आणि मी ही सगळी फुले बाबांना वाहुन टाकली.
आज दोन वर्ष झालीत. मला माहितीये, आज घरी आई एकीकडे डोळे टिपत असेल... लहान भाउ उदासवाणा बाबांच्या फोटोकडे बघत असणार...मोठाही नि:शब्द असणार! आणि मी ... मी तर वाट बघतेय, कधी बाबांची हाक ऐकु येतेय," बिटको,.......!!!

बाबा, तुम्हाला आठवत असेल
तुमच्या प्रत्येक ब-या वाईट
आठवणींना साथ करणारा पाऊस
तुमच्या प्रत्येक बदलीच्या ठिकाणी
सामान नेतांना सोबत करायचा!

तुम्ही प्रथम धुळ्याला
बदली करुन गेलात तेव्हाही
भर पावसात अर्ध्या भिंतींच्या
घरात सामान टाकले!
...आणि धुळ्याहुन आपण
पुण्याला बदलुन आलो
तेव्हाही पाऊस सोबत होताच!

तुम्ही जायच्या ६ महिने आधीपासुन
तुमचं बोलणं चालु होतं....
"चला, ११वर्ष झाली या घरात
आता घर बदलायला पाहिजे"

२७ एप्रिलला २००९ ला तुम्ही
ह्या जगातलं घर बदलुन
दुस-या जगात गेलात एकटेच...!
सामान न्यायची परवानगी नव्हती...
 सगळं आम्हालाच देउन गेलात!
हो, फक्त 'दत्तबावनी'ची शिदोरी
दिली होती, ती आहे ना अजुनही सोबत?

तेव्हा तुम्हाला वाटल असेल की  या वेळेस
 भर उन्हाळ्यात पाऊस नाही सोबतीला!
.
.
.
तुमचा अंदाज चुकला बाबा
पाऊस होता...आम्हा सर्वांच्या डोळ्यात
आणि कोसळत होता नि:शब्दपणे!!!

Monday, 18 April 2011

ज्ञानकण

ज्ञानकणः

संत गोरा कुंभारः जन्म शके ११८९ मधे तेरढोकी येथे
संत नामदेव: कार्तिक शु. ११ रविवार शके ११९२
संत निवृत्तीनाथः जन्म शके ११९५ मधे
संत ज्ञानेश्वरः जन्म शके ११९७ मधे
संत सोपानदेवः जन्म शके ११९९ मधे
संत मुक्ताबाई: जन्म शके १२०१ मधे

मराठीतील साहित्यिक आणि त्यांची टोपणनावे

दत्तात्रय घाटे:                    दत्तकवी

डी.व्ही. गद्रे:                      काव्यविहारी

शंकर केशव कानेटकरः गिरीश

शंकर गर्गे:                      दिवाकर

व्ही.सी.गुर्जरः                  चंद्रगुप्त

सौ. मालतीबाई बेडेकरः शिरुरकर

भाऊसाहेब सोमणः        किरात

नारायण गुप्ते:                 बी

वि.वा. शिरवाडकरः         कुसुमाग्रज

प्र.के.अत्रे:                        केशवकुमार

माणिक गोडघाटे:           ग्रेस

कृ.के.दामले:                   केशवसुत

रा.गो. देशमुखः              लोकहितवादी

वि.ग.करंदीकरः             विनायक

राम गणेश गडकरी:     गोविंदाग्रज

त्र्यंबक बापुजी ठोंबरे:   बालकवी

दिनकर ग. केळकरः     अज्ञातवासी

अ.ब.कोल्हटकरः           संदेश

न. रा. फाटकः               अंतर्भेदी

मराठीतील पहिली साहित्य कृती: विवेक सिंधू
मराठीतील पहिली कादंबरी: "यमुना पर्यटन"
मराठीतील पहिली स्त्री नाटककारः सोनाबाई चिमाजी केरकर
सोनाबाई केरकरांचे पहिले नाट्यलेखनः "छत्रपती शिवाजी"- १८९६
बाबुराव अर्नाळकरांचे मूळ नावः चंद्रकांत सखाराम चव्हाण
मराठी वाड्मयाच्या इतिहासातील कोश-युगाचे प्रणेते: डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर
टारझनचा मराठीत प्रथम अनुवाद करणारे: कृष्णकुमार शेरतुकडे
उमर खय्यामचा रुबाया प्रथम मराठीत आणणारे: माधव ज्युलियन
शाहिर अनंत फंदी यांचे आडनावः घोलप

Tuesday, 29 March 2011

तू-(वजा) मी = शुन्य!!!

आताशा, जीवनाची गणितं नाही
मांडत बसत मी!
कारण, तुझी केवढी तक्रार
माझ्या व्यवहारशून्यतेबद्दलची!!

आठवत असेल तुला
कधीतरी रस्त्याने
जातांना झालेला
'पायथागोरसच्या सिद्धांता'वर
आपला वाद!

कर्ण वर्ग बरोबर बाजु वर्गांची बेरीज
हे माहित असुनही तुझी जवळच्या
रस्त्याने जाण्याची धडपड
आणि मग काळ, काम, वेगाचं
गणित मांडल्यावर होणारा वैताग
तशीच तुझी हातचं राखुन
बेरजा करण्याची सवय!!

हं! आता तुझ्यासारखं व्यावहारीक
नसेल होता येत मला....
पण तू - (वजा) मी = एक मोठ शुन्य
हे तरी मान्य करशील ना?

Monday, 28 March 2011

सिद्धमंगल स्तोत्र


श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात हे स्तोत्र दिलेले आहे.

श्रीमदनन्त श्रीविभूषित अप्पल लक्ष्मी नरसिम्हराजा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||१||

श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखिधरा श्रीपादा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||२||

माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||३||

सत्य ऋषीश्वर दुहितानन्दन बापनार्यनुत श्रीचरणा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||४||

सवित्रृकाठकचयन पुण्यफल भारद्वाजऋषि गोत्र संभवा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||५||

दो चौपाती देव लक्ष्मी घनसख्या बोधित श्रीचरणा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||६||

पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भपुण्यफल संजाता
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||७||

सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेवप्रभु श्रीपादा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||८||

पीठिकापुर नित्यविहारा मधुमती दत्ता मन्गलरूपा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभव ||९||